कामगारांना ९० दिवस काम केल्याचे दाखवून फसवणूक, बनावट प्रमाणपत्राच्या 'रॅकेट'चा भंडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 18:32 IST2025-07-16T18:31:27+5:302025-07-16T18:32:05+5:30
Nagpur : इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या संकेतस्थळावर करायचे अपलोडिंग

Fraudulent workers, fake certificate 'racket' busted by showing they worked for 90 days
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कामगारांना ९० दिवस काम केल्याचे बोगस प्रमाणपत्र देणाऱ्या रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. एका तथाकथित स्वयंसेवी संस्थाचालकाकडून हा प्रकार सुरू होता. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.
अजयकुमार नाखले (शांती अपार्टमेंट, लोहार समाज भवनाच्या मागे) असे आरोपीचे नाव असून तो राष्ट्र संघर्ष गवंडी कामगार संघटना चालवत होता. या नावाखाली त्याने गोरखधंदा थाटला होता. कामगार विभागातील दुकाने निरीक्षक रिना पोराटे यांनी तक्रार केली आहे. अशा प्रकरणांच्या तपासणीसाठी शासनाने दक्षता पथक स्थापन केले आहे. १० जुलै रोजी अपर कामगार आयुक्तांना या गोरखधंद्याबाबत माहिती मिळाली. अजयकुमार नाखले हा कार्यालयातून बनावट प्रमाणपत्र तयार करून, ती इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड करत होता. त्याबदल्यात तो कामगारांकडून पैसे उकळत होता.
सदर माहितीच्या आधारे डेटा दक्षता पथकाने नाखलेच्या कार्यालयावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान त्याठिकाणी ५१ बोगस बनावट प्रमाणपत्र जप्त करण्यात आले. या ५१ प्रमाणपत्रांपैकी ४६ प्रमाणपत्रे कळमेश्वरमधील ग्रामपंचायत मोहगाव (सा.) व वडगाव (गुजर) यांच्या नावाने दिसून आली; परंतु सखोल चौकशीत ती प्रमाणपत्रे निर्गमित झालेली नसून पूर्णतः बनावट असल्याचे संबंधित ग्रामपंचायतींनी लेखी स्वरूपात स्पष्ट केले आहे.
प्रमाणपत्र तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या व शिक्के वापरण्यात आले होते. तसेच कामगारांची प्रत्यक्ष कामगिरी किंवा उपस्थिती दर्शविणारे कोणतेही खरे पुरावे नव्हते. पोलिसांना तेथे काही प्रमाणपत्रे कोऱ्या स्वरूपातही आढळली. त्यांचा गैरवापर करून भविष्यात फसवणूक केली जाणार होती.
सरकारी निधीचा अपहार
आरोपीने सरकारी यंत्रणेची दिशाभूल होऊन सरकारी निधीचा अपहार केला असल्याची बाब समोर आली. या प्रकरणात अजयकुमार नाखले हा फसवणूक करून बोगस दस्तऐवज तयार करणे, त्याचा वापर करणे आणि सामान्य जनतेकडून अवैधरीत्या पैसे उकळणे या गंभीर स्वरूपाच्या अपराधांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याविरोधात अजनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.