नकली नोटांच्या आड असली फसवणुकीचा डाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 14:26 IST2021-11-23T10:23:16+5:302021-11-23T14:26:29+5:30
अनेक वर्षांपासून अनेकांना गंडा घालणाऱ्या या टोळीने ठिकठिकाणच्या व्यावसायिकांसह काही नेत्यांनाही गंडा घातल्याचा संशय आहे. दरम्यान, शहर पोलीस आता ॲक्शन मोडवर आले असून, या टोळीतील आरोपीही पोलिसांच्या टप्प्यात आले आहेत.

नकली नोटांच्या आड असली फसवणुकीचा डाव!
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लाखोंची रोकड गमावूनही फसगत झालेली मंडळी पोलिसांकडे तक्रार देत नसल्याने नकली नोटांच्या आड असली फसवणूक करणाऱ्या टोळीचा गोरखधंदा बिनबोभाट सुरू आहे. दरम्यान, शहर पोलीस आता ॲक्शन मोडवर आले असून, या टोळीतील आरोपीही पोलिसांच्या टप्प्यात आले आहेत.
अनेक वर्षांपासून अनेकांना गंडा घालणाऱ्या या टोळीने ठिकठिकाणच्या व्यावसायिकांसह काही नेत्यांनाही गंडा घातल्याचा संशय आहे. दरम्यान, टोळीच्या गोरखधंद्याची माहिती मिळाल्याने पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी लगेच ॲक्शन प्लान तयार केला. त्यानुसार, गुन्हे शाखेच्या सुमारे ५० पोलिसांच्या ताफ्याने आरोपींच्या कार्यालयाच्या सभोवताल मध्यरात्री गराडा घातला. निवडक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आरोपीच्या कार्यालयात धडक देऊन दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी पहाटे चारपर्यंत कार्यालयाची झडती घेतल्यानंतर तेथे काही नोटांनी भरलेले बॉक्स पोलिसांना आढळले. घातक शस्त्रेही सापडली. ती तपासण्यात आली असता बहुतांश नोटांचे बंडल ‘भारतीय बच्चो का बँक’चे होते. आरोपींकडून सावज जाळ्यात ओढण्यासाठी या बनावट नोटांच्या बंडल्याच्या वर आणि खाली एक एक पाचशेंची असली नोट लावण्यात येत असल्याचे यातून उघड झाले आहे.
साठ लाखांच्या टोपीची कबुली
हाती लागलेल्या या टोळीतील दोन भामट्यांना पोलिसांनी बाजीराव दाखवल्यानंतर त्यांनी ‘काही दिवसांपूर्वी आम्ही एका जणाला अशा प्रकारे ६० लाखांची टोपी घातली’ अशी कबुली दिल्याचे समजते. मात्र, साठ लाख रुपये आमच्याकडे आणणारा कोण होता, ते आम्ही ओळखत नसल्याची मखलाशीही त्यांनी पोलिसांकडे केल्याची माहिती आहे.
फसगत झालेल्यांनो आमच्याकडे या - डीसीपी पंडित
अनेकांची रोकड गिळंकृत करणाऱ्या या टोळीचा पोलिसांनी छडा लावला आहे. आरोपीही पोलिसांच्या टप्प्यात आहेत. मात्र, ज्यांची फसवणूक झाली अशा एकाही जणाने पोलिसांकडे तक्रारच केलेली नाही. त्यामुळे पोलीस वेट ॲन्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. या टोळीच्या जाळ्यात अडकून आपली रोकड गमविणाऱ्या मंडळींनी थेट गुन्हे शाखेच्या कार्यालयात किंवा कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार करावी, असे आवाहन गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांनी केले आहे.