लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - भूखंड विक्रीच्या साैद्यापोटी आठ लाख रुपये घेऊन एका व्यक्तीची चाैघांनी फसवणूक केली. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी गुरुवारी दोन महिलांसह चाैघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
अंबाझरीतील आशिष वामनराव वानखेडे (वय ३४) यांना ६ जानेवारी २०२० ला तेलंगखेडी हनुमान मंदिराजवळ एका घरावर २०७० फुटाचा भूखंड विकणे आहे, असा बोर्ड दिसला. त्यावर नमूद मोबाईल नंबरवर वानखेडे यांनी संपर्क केला. त्यावेळी आरोपी उदय चंद्रकांत भुते (वय ५३) आणि रवींद्र चंद्रकांत भुते (वय ५१, रा. श्रीनगर, जयताळा रोड) यांनी वानखेडेंशी बोलून त्या भूखंडाचा २५ लाखांत सौदा केला. ८ लाख रुपये अग्रीम घेऊन उर्वरित रक्कम विक्रीपत्राच्या वेळी देण्याचे ठरले. त्यानुसार, वानखेडेंनी ८ जानेवारीला ३ तर १४ जानेवारीला ५ लाख रुपयांचा धनादेश भुते बंधूंना दिला. त्यानंतर विक्रीपत्र करून घेण्यासाठी ते आरोपी भुते बंधूच्या मागे लागले. प्रारंभी लॉकडाऊनचे कारण सांगणाऱ्या आरोपींनी नंतर तो भूखंड चैताली सुनील ठवकर (वय ४६, रा. रामेश्वरी) तसेच रंजना घनशाम अस्वले (वय ४९, रा. शाहूनगर मानेवाडा) यांना विकल्याचे सांगितले. प्रत्यक्षात त्या भूखंडाची विक्री झालीच नाही. आरोपींनी वानखेडे यांचे आठ लाख रुपये हडपण्यासाठी ती दिशाभूल करणारी माहिती त्यांना दिल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे वानखेडे यांनी अंबाझरी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपाखाली उदय आणि रवींद्र भुते तसेच चैताली ठवकर आणि रंजना अस्वले या चौघांविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.
---