गारमेंट प्रशिक्षणाच्या नावावर अफरातफर : महिला आर्थिक विकास महामंडळात ८७.८५ लाखांचा गैरव्यवहार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:34 IST2025-06-26T15:33:11+5:302025-06-26T15:34:00+5:30
महिला प्रशिक्षणाच्या नावावर 'सामाजिक' फसवणूक : २२७ पैकी १७४ मशीन गायब!

Fraud in the name of garment training: Misappropriation of Rs 87.85 lakhs in Women's Economic Development Corporation
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने सुरू केलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळात गैरव्यवहार झाल्याने खळबळ उडाली आहे. महिलांना प्रशिक्षण देण्याच्या आणि मशीन पुरवण्याच्या नावाखाली जवळपास ८८ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कोराडी पोलिस ठाण्यात पुण्यातील एका महिलेसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निवेदिता अमोल नाहर (अग्रवाल गोडाऊन, शिवडी इंडस्ट्रियल इस्टेट, पुणे) आणि उमेश रॉय जाधव (इचलकरंजी) अशी आरोपींची नावे आहेत. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. महामंडळातर्फे महिलांना वस्त्र व्यवसायाबाबत माहिती आणि प्रशिक्षण दिले जाते.
महामंडळाचे केंद्र कोराडी येथील जगदंबा मंदिर परिसराजवळ नियोजनानुसार गारमेंट सेंटरमध्ये २०० महिलांना प्रशिक्षण दिले जाणार होते. शिवणकाम आणि भरतकामाचे प्रशिक्षण देण्याचे काम पुण्यातील सोशल बफरची संचालिका निवेदिता नाहरला देण्यात आले होते. त्यासाठी शासनाने २२७मशीन उपलब्ध करून दिल्या होत्या. संबंधित साहित्य इचलकरंजी येथील वरद एंटरप्रायझेसकडून घेण्याचे निश्चित झाले होते. २९ फेब्रुवारी २०२९ ते २६ एप्रिल २०२४ या कालावधीत निवेदिताने वरद एन्टरप्रायझेसचा मालक उमेश रॉय जाधवशी संगनमत करून २२७पैकी १७४ मशीनची अफरातफर केली. त्यांची किंमत ८७.८५ लाख इतकी होती. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता आरोपींनी अफरातफर केल्याची बाब समोर आली.