नागपुरात कोचिंग क्लासच्या संचालिकेची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 20:21 IST2020-10-21T20:18:14+5:302020-10-21T20:21:11+5:30
Fraud, Lady Teacher, Crime News कोचिंग क्लासच्या संचालिकेची फसवणूक करून तिला धमकी देणाऱ्या युवकाविरुद्ध सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

नागपुरात कोचिंग क्लासच्या संचालिकेची फसवणूक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोचिंग क्लासच्या संचालिकेची फसवणूक करून तिला धमकी देणाऱ्या युवकाविरुद्ध सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विजय कुळकर्णी (३०) असे आरोपीचे नाव आहे. सोमलवाडा चौक येथील रहिवासी कविता प्रवीण जाधव यांची ओजस अकॅडमी ऑफ मॅथेमॅटिक्स आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १० वर्षांंपूर्वी विजय कविताच्या कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थी म्हणून आला होता. होतकरू असल्यामुळे कविता आणि त्यांच्या कुटुंबीयांशी त्याचे जवळचे संबंध निर्माण झाले. त्याचे त्यांच्या घरी येणे जाणे वाढले. तो कोचिंग क्लासमध्ये शिकवू लागला. कविता आणि त्यांच्या कुटुंबीयांचा विश्वास संपादन केल्यानंतर विजय कोचिंग क्लासशी निगडित आर्थिक व्यवहारही करू लागला. त्याने ४० हजार रुपयांची अफरातफर केली. विजयबाबत माहीत झाल्यानंतर कविता सतर्क झाल्या. त्यांनी त्याच्याशी व्यवहार कमी केले. त्यानंतर विजय पैसे मिळविण्यासाठी नवनव्या क्लृप्त्या शोधू लागला. त्याने कविताला आईच्या उपचारासाठी ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. कविताने मनाई केली असता तो शिवीगाळ करू लागला. विजयने कविताच्या मूळ कागदपत्रांची फाईल आणि मुलाचे कागदपत्र जाळुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कविताने सोनेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी अफरातफरीचा गुन्हा दाखल केला आहे. विजय उच्चशिक्षित आहे. त्याच्या कृत्यामुळे पोलिसही आश्चर्यचकीत झाले आहेत. ते घटनेचे कारण शोधत आहेत.