लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अनेक विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणारा तथाकथित समुपदेशक विजय घायवट याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका विद्यार्थिनीने समोर येत त्याच्याविरोधात तक्रार केली आहे. हा आरोपीविरोधातील चौथा गुन्हा ठरला आहे. हुडकेश्वर पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
करिअर कौन्सिलिंगच्या नावाखाली हुडकेश्वरमध्ये मनोविकास केंद्र चालवणारा घायवट नागपूर आणि शेजारच्या जिल्ह्यांतील विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करायचा. तो विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्याच्या बहाण्याने त्यांच्या केंद्रात ठेवत असे. तिथे त्याने काही विद्यार्थिनींशी जवळीक साधून त्यांचे शोषण केले. बहुतेक विद्यार्थिनी अल्पवयीन होत्या. या प्रकरणात अटक झाल्यानंतर तपासादरम्यान, पोलिसांना घायवटच्या केंद्रातून क्लिपिंग्ज, छायाचित्रे आणि सीसीटीव्ही फुटेज सापडले. ज्यामध्ये अनेक विद्यार्थिनींना त्याने टार्गेट केल्याची बाब समोर आली. ४ जानेवारी रोजी दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.
आता चौथा गुन्हा दाखल झाला आहे. तीन वर्षा अगोदर एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर आरोपीने अत्याचार केला होता. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ४ जानेवारी रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यात तो कारागृहात आहे. न्यायालयाकडून प्रोडक्शन वॉरंटवर त्याला पुन्हा अटक केली जाईल.
परवानगीविनाच सुरू होते केंद्र आरोपी घायवट बेकायदेशीर केंद्र चालवत होता. त्याने परवानगीही घेतली नव्हती. त्याने मानसशास्त्रात एमए केले आहे. सुरुवातीला स्थानिक लोकांनीही त्याच्या केंद्राबाबत प्रश्न उपस्थित केले.
अभ्यासात मदत करून ओढायचा जाळ्यात तो काही विद्यार्थिनींना अभ्यासात मदत करायचा. त्यामुळे त्या त्याच्या जाळ्यात ओढल्या जायच्या. तो त्यांना फिरायला नेऊन तेथे सिगारेट, दारू पाजायचा व अत्याचार करायचा. याचा व्हिडीओ काढल्याने विद्यार्थिनी बदनामीमुळे गप्प बसायच्या.
काही कुटुंबीयांचा तक्रार दाखल करण्यास नकार पोलिसांनी काही पीडित विद्यार्थिनींशी संपर्क साधला. मात्र बदनामीपोटी त्या व त्यांचे कुटुंबीय तक्रार दाखल करण्यास नकार देत आहेत. पोलिसही संयम बाळगत आहेत.