रेमडेसिविरचे ब्लॅक मार्केटिंगमध्ये आणखी चौघे जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:08 IST2021-04-19T04:08:08+5:302021-04-19T04:08:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : रेमडेसिविरचे ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्या टोळीतील आणखी चार आरोपींना जरीपटका पोलिसांनी जेरबंद केले. त्यामुळे ...

रेमडेसिविरचे ब्लॅक मार्केटिंगमध्ये आणखी चौघे जेरबंद
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रेमडेसिविरचे ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्या टोळीतील आणखी चार आरोपींना जरीपटका पोलिसांनी जेरबंद केले. त्यामुळे या दोन टोळीतील आरोपींची संख्या आता १२ झाली आहे. जरीपटक्यातील टोळीचा म्होरक्या शुअरटेक हॉस्पिटलमधील वार्डबॉय ईश्वर उर्फ बिट्टू मंडल दिसत असला तरी त्याला संचालित करणारा दुसराच कुणीतरी असावा, असा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणात रविवारी अटक केलेल्या आरोपींमध्ये दीपक टेंभरे (वय २०, रा. योगी अरविंदनगर), रोहित संजय धोटे (वय२९, रा. कुशीनगर, जरीपटका), मनोज रामाजी नंदनकर (वय२५, रा. आठवा मैल वाडी) आणि महेश दामोदर ठाकरे (वय ३२, रा. जुना बाभुळखेडा, अजनी) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, मंडल याने १५ दिवसांपूर्वी हा गोरखधंदा सुरू केला होता. सुरुवातीला मंडलच्या टोळीत जितेंद्र शिंदे (वय २१, रा. मॉडल मिल चाळ) आणि मूळचा काटोल येथील रहिवासी असलेला औषध विक्रेता विवेक उर्फ विकास लक्ष्मण ढोकणे पाटील (वय ३४, रा. मनीषनगर, कथित पत्रकार) सहभागी होता. नंतर या टोळीत शुअरटेकमधील सहभागी झालेले मंडलचे साथीदार रेमडेसिविर चोरून धोटे, ठाकरे, शिंदे आणि ढोकणे याच्याकडे द्यायचे. हे भामटे ते १५ हजारांपासून तो २५ हजारांपर्यंत मनात येईल त्या किमतीत विकू लागले. एकट्या ढोकणे पाटीलने यापूर्वी ६ इंजेक्शन १५ हजारांपासून ते २३ हजारांपर्यंत विकल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या तपासात त्याने मंडलकडून १० हजारात विकत घेऊन ते जास्त किमतीत विकल्याचे सांगितले आहे.
२ दिवसांचा पीसीआर
दरम्यान, पोलिसांनी आरोपींना रविवारी न्यायालयात हजर करून त्यांचा दोन दिवसांचा पीसीआर मिळवला. तर कामठीतील अशाच टोळीतील एका आरोपीला ४ दिवसांचा पीसीआर मिळाला आहे.
कोविड हॉस्पिटलमध्ये रेमडेसिविरची चोरी
क्रीडा चाैकातील ओजस कोविड सेंटरमधून रेमडेसिविर चोरणाऱ्या तेथीलच एका वाॅर्ड बॉयला इमामवाडा पोलिसांनी अटक केली. महेंद्र रतनलाल रंगारी (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. तो दिघोरीतील विठ्ठलनगरात राहतो. आरोपी रंगारी हा ओजस कोविड सेंटरमध्ये वाॅर्ड बॉय आहे. तेथे भरती असलेल्या रजनी नीतेश भोंगाडे (वय ३०, माैदा) यांच्यासाठी आणलेले रेमडेसिविर इंजेक्शन संधी साधून रंगारी याने शनिवारी दुपारी लंपास केले. इंजेक्शन चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर इमामवाडा पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हॉस्पिटलचा वाॅर्ड बॉय महेंद्र रंगारीने ते इंजेक्शन चोरल्याचे सीसीटीव्हीत दिसले. कोविड सेंटरचे व्यवस्थापक अशोक बिसेन यांची तक्रार नोंदवून घेत इमामवाडा पोलिसांनी आरोपी रंगारीला अटक केली. तो रेमडेसिविर ब्लॅकमार्केट करणाऱ्या टोळीशी संबंधित आहे का, त्याचा शोध घेतला जात आहे.