नागपूर अग्निशमन विभागाच्या ताफ्यात चार मिनी फायर टेंडर दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 00:58 IST2018-11-22T00:56:02+5:302018-11-22T00:58:09+5:30
शहरातील वर्दळीच्या व बाजार भाग असलेल्या इतवारी, महाल, गांधीबाग, लालगंज यासह अरुंद रस्ते असलेल्या वस्त्यांतील आग नियंत्रणसाठी उपयोगी ठरणारे चार मिनी फायर टेंडर महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दाखल झाले आहेत.

नागपूर अग्निशमन विभागाच्या ताफ्यात चार मिनी फायर टेंडर दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील वर्दळीच्या व बाजार भाग असलेल्या इतवारी, महाल, गांधीबाग, लालगंज यासह अरुंद रस्ते असलेल्या वस्त्यांतील आग नियंत्रणसाठी उपयोगी ठरणारे चार मिनी फायर टेंडर महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. या टेंडरमुळे अशा भागांमध्ये आग आटोक्यात आणताना मदत होणार आहे.
या टेंडरला जास्त पाणी वाहून नेणारे ब्राऊझर लावल्यास अधिक पाणी क्षमतेचा एकाच वाहनातून योग्य तो वापर करून मोठी आगहानी टाळता येईल. आतापर्यंत दलात 'स्वराज माझदा' या मिनी टेंडरचा वापर केला जात होता. अधिक क्षमतेचा पंप लागलेल्या या मिनी फायर टेंडरची पाणी वाहून नेण्याची क्षमता २ हजार लिटर एवढी आहे. शहराचा व्याप विचारात घेता चार टेंडर शहरासाठी पुरेसे आहेत. दरवर्षी यात चार टेंडरची भर पडेल. त्यावेळी नव्या अग्निशमन केंद्रात त्या ठेवण्यात येतील.
या टेंडरसाठी दोन वेगवेगळ्या निविदा काढण्यात आल्या होत्या. यापूर्वीच्या मिनी फायर टेंडरला २० वर्षे झाली होती. त्या आता कामात पडत नव्हत्या. या मिनी फायर टेंडर आत गल्लीत गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे दुसरे मोठे फायर टेंडर नेण्याची गरज भासणार नाही. एक मोठे ५ हजार ते १६ हजार लिटर क्षमतेचे ब्राऊझरचा पाईप या टेंडरमध्ये टाकल्यावरही किमान चार पंपाचे काम भागू शकेल. नागपूर शहरात एका गल्लीत एक टेंडर गेल्यावर त्यामागे दुसरे वाहन अशी गर्दी व्हायची. त्यामुळे आग विझविण्यासाठीही काही मर्यादा असायच्या. आता वाहनांची गर्दी होणार नाही. शिवाय, अनेक तास सतत आगीवर पाण्याचा मारा करता येणे शक्य होणार असल्याची माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांनी दिली.
लवकरच दोन ब्राऊजरही येणार
किमान चार मोठे टँकरची पाणी क्षमता असणारे तब्बल १६ हजार लिटर पाण्याची क्षमता असलेले ब्राऊझरही प्रस्तावित आहेत. या ब्राऊजरच्या दरनिश्चितीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात येणार आहे. दरनिश्चितीला मंजुरी मिळाल्यानंतर दोन ब्राऊजरही पुढील वर्षी विभागात दाखल होऊ शकतात. मिनी फायर टेंडर गल्लीत गेल्यानंतर या ब्राऊजरचा पाईप टेंडरच्या टाकीत टाकल्यास किमान चार वाहनांच्या पाणी क्षमतेचा मारा आगीवर करता येणे शक्य होईल.