दिल्लीहून नागपुरात आलेल्या चार जणांना कोरोना; आरोग्य विभाग सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2022 18:38 IST2022-04-26T18:10:31+5:302022-04-26T18:38:14+5:30
सोमवारी एकाच दिवशी चार रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.

दिल्लीहून नागपुरात आलेल्या चार जणांना कोरोना; आरोग्य विभाग सतर्क
नागपूर : कोरोनाची तिसरी लाट संपुष्टात आली असली तरी नवी दिल्ली, उत्तर प्रदेश व हरियाणा राज्यांत कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी पॉझिटिव्ह आलेले चारही रुग्ण दिल्लीहून आलेले आहेत. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोनाच्या प्रादुर्भावाला मार्च २०२० पासून सुरुवात झाली होती. कोरोनाची पहिली लाट दिल्ली प्रवाशाची पार्श्वभूमी असलेल्या प्रवाशांकडून झाल्याचे बोलले जात होते. आता जेव्हा जून महिन्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असताना मागील तीन दिवसांपासून रुग्ण दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, सोमवारी पहिल्यांदाच एकाच दिवशी चार रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे.
- तिघे धरमपेठ तर एक रुग्ण धंतोली झोनमधील
पॉझिटिव्ह आलेल्या चार रुग्णांमध्ये ४८ व ५० वर्षीय महिला असून ४३ व ७५ वर्षीय पुरुष आहे. यातील तिघे एकाच कुटुंबातील असून ते धरपेठ झोनअंतर्गत वसाहतीमध्ये राहतात. तर एक रुग्ण हा धंतोली झोनमधील आहे. विविध कामानिमित्त हे चौघे दिल्लीला गेले होते. दिल्लीहून नागपूरला परतल्यावर त्यांना लक्षणे दिसून आल्याने त्यांनी रविवारी खासगी लॅबमधून तपासणी केली. सोमवारी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
- संपर्कात आलेल्यांमध्ये लक्षणे दिसल्यावरच चाचणी
सध्या महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना हुडकून काढून (ट्रेसिंग) त्यांची चाचणी करणे बंद आहे. परंतु मनपाच्या एका अधिकाऱ्यांनुसार संपर्कात आलेल्यांमध्ये लक्षणे दिसताच त्यांची तपासणी केली जाईल.