उपराजधानीत चार दिवस ‘हाय अलर्ट’; ६ हजार जवान तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 22:26 IST2022-04-13T22:26:00+5:302022-04-13T22:26:31+5:30
Nagpur News चार दिवसांत पाच मोठे कार्यक्रम असल्यामुळे शहरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. गुरुवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पोलीस, होमगार्ड, तसेच एसआरपीच्या ६ हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे.

उपराजधानीत चार दिवस ‘हाय अलर्ट’; ६ हजार जवान तैनात
नागपूर : चार दिवसांत पाच मोठे कार्यक्रम असल्यामुळे शहरात हाय अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. गुरुवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पोलीस, होमगार्ड, तसेच एसआरपीच्या ६ हजार जवानांना तैनात करण्यात आले आहे.
विविध शहरांत झालेल्या अप्रिय घटनांमुळे पोलिसांना कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयार ठेवण्यात आले आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत १८ आरोपींना तडीपार करून ३६ जणांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. रामनवमीनंतर काही शहरांत झालेल्या घटनांमुळे गुप्तहेर संघटनांनी राज्यांना मोठ्या आयोजनात अतिरिक्त खबरदारी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.
१४ एप्रिलला डॉ.बाबासाहेब आंबेडकर, तसेच महावीर जयंती आहे. दोन वर्षांपासून सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम बंद होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला शहरात मोठा उत्साह असतो. या वर्षीही आंबेडकर जयंतीला मोठे आयोजन होणार आहे. शहरात जवळपास ४०० ठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहरात ३५० बौद्ध विहार आहेत. तेथेही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
पोलिसांनी मोठ्या कार्यक्रमात पोलीस तैनात केले आहेत. रॅलीवर विशेष लक्ष देण्यासाठी नियोजन केले आहे. कोणतीही गडबड झाल्यास, त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, असामाजिक तत्त्वांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. यासाठी सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले आहेत. पोलिसांच्या मदतीसाठी राज्य राखीव पोलीस आणि शीघ्र कृती दल तैनात राहणार आहे. १४ एप्रिलला महावीर जयंतीही आहे, तर १६ एप्रिलला हनुमान जयंती आहे. हनुमान जयंतीला शहरात अनेक ठिकाणी कार्यक्रम होतात. १७ एप्रिलला इस्टर संडे आहे. सणांमुळे पोलिसांना आधीच पूर्वतयारी केली आहे.