नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रथम प्र-कुलगुरु तथा एम.पी. देव स्मृती धरमपेठ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. योगानंद काळे यांचे शनिवारी नागपुरात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (दि.२०) रोजी सायंकाळी ६ वाजता सहकारनगर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
डॉ. योगानंद काळे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्रथम प्र-कुलगुरु म्हणून १९९५ ते २००१ दरम्यान कार्य केले आहे. तसेच एम.पी. देव स्मृती धरमपेठ महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून १९९० ते १९९५ कार्य केले आहे. ते भारतीय अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक होते. भारतीय अर्थशास्त्राची जगभरात प्रवास करुन मांडणी केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या आर्थिक आघाडीचे विचारवंत होते. आर्थिकदृष्ट्या विदर्भ राज्याची सक्षमता या विषयावर त्यांचे विशेष प्रभुत्व होते.
बुलढाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा हे डॉ. योगानंद काळे यांचे जन्मगाव. सहा भाऊ दोन बहिणी आणि आई-वडिल असा परिवार. अशा पार्श्वभूमीवर डॉ. योगानंद काळे यांचा खेड्यातील प्राथमिक शिक्षणापासून तर थेट राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्र-कुलगुरु सारख्या च्च पदापर्यंतचा प्रवास कष्ट आणि संघर्ष यांनी भरलेला आहे. एम.कॉम.,एम.फिल., डीबीएम या पदव्या त्यांनी प्राप्त केल्या व नागपूर येथील धरमपेठ आर्टस् ॲण्ड कॉमर्स कॉलेजमध्ये सुमारे ११ वर्षे प्राध्यापक म्हणून नंतर त्याच महाविद्यालयात सुमारे १४ वर्षे उपप्राचार्य म्हणून आणि अखेरीस त्याच महाविद्यालयात प्राचार्य या नात्याने जबाबदारी सांभाळली. याच काळात ऑगस्ट १९९५ मध्ये त्यांची नागपूर विद्यापीठात प्र-कुलगुरु म्हणून नियुक्ती झाली होती.
एक प्रभावी वक्ते समर्पित शिक्षण, कुशल व मनमिळाऊ प्रशासक आणि विद्यार्थीप्रिय प्राध्यापक या नात्याने त्यांचा लौकिक सर्वदूर पसरला. 'विदर्भाचा आर्थिक अनुशेष' या विषयावरील त्यांचा संशोधनपर प्रबंध गाजला व आज त्याला एक संदर्भमूल्य प्राप्त झाले आहे. विद्यार्थ्यांच्या उपयोगी अशा क्रमिक पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले. आणि वाणिज्य शाखेतील पीएच.डी. साठी मान्यताप्राप्त मार्गदर्शक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज, शिमला, या प्रतिष्ठित शासकीय संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्यत्वही त्यांना प्राप्त झाले होते.