माजी नगरसेवकांची उद्धवसेनेतून काँग्रेसमध्ये घरवापसी; ठाकरे-चतुर्वेदींची ‘हात’ मिळवणी, शाई फेकचे डाग पुसले
By कमलेश वानखेडे | Updated: November 10, 2025 19:41 IST2025-11-10T19:39:10+5:302025-11-10T19:41:05+5:30
Nagpur : माजी नगरसेवक दीपक कापसे, नाना झोडे, श्रीकांत कैकाडे यांची उद्धवसेनेतून काँग्रेसमध्ये घरवापसी

Former Nagarsevak return home from Uddhav Sena to Congress; Thackeray-Chaturvedi's handshake, ink stains are wiped away
नागपूर : महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे शहर अध्यक्ष आ. विकास ठाकरे व माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांच्यात तिकीट वाटपावरून झालेला वाद टोकावर गेला होता. पूर्व नागपुरातील जाहीर सभेत काँग्रेसच्या प्रचारासाठी आलेले काँग्रेसचे तत्कालिन प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या अंगावर शाई फेकण्यात आली होती. आता शाईचे ते डाग पुसुन काढत ठाकरे- चतुर्वेदी यांनी ‘हात’ मिळवणी केली आहे. चतुर्वेदी यांचे खंदे समर्थक व काँग्रेस सोडून उद्धव सेनेत गेलेले उद्धव सेनेचे शहर प्रमुख माजी नगरसेवक दीपक कापसे, नाना झोडे यांच्यासह प्रमुख कार्यकत्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे.
देवडिया काँग्रेस भवनात सोमवारी दीपक कापसे, नाना झोंडे यांच्यासह माजी नगरसेविका कुमुदिनी कैकाडे यांचे पती उद्धव सेनेचेे विधानसभा संघटक श्रीकांत कैकाडे, विभाग प्रमुख रमेश अंबर्ते, उपजिल्हा प्रमुख गुड्डू रहांगडाले, अंगद हिरोंदे, उप विभाग प्रमुख गोलू गुप्ता यांच्यासह कार्यकर्त्यांच्या गळ्यात आ. विकास ठाकरे व सतीश चतुर्वेदी यांची काँग्रेसचा दुपट्टा घालून पक्ष प्रवेश दिला. यावेळी आ. अभिजित वंजारी, प्रदेश महासचिव उमाकांत अग्नीहोत्री, माजी विरोधी पक्षनेते संजय महाकाळकर आदी उपस्थित होते. दीपक कापसे यांनी महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष, नासुप्रचे विश्वस्त, प्रदेश काँग्रेसचे महासिचव अशी पदे त्यांनी भूषविली आहेत.
कापसे हे काँग्रेसकडून तीनदा नगरसेवक म्हणून विजयी झाले आहेत. २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग ३० मध्ये कापसे व संजय महाकाळकर यांनी उमेदवारीवर दावा केला होता. त्यावेळी कापसे यांचे तिकीट कटले होते. त्यामुळे ते बंडखोरी करीत अपक्ष लढले. त्यांनी सुमारे ७ हजार मते घेतली. मात्र, त्यानंतरही महाकाळकर विजयी झाले होते. यानंतर चतुर्वेदी यांचे पूत्र दुष्यंत चतुर्वेदी हे शिवसेनेकडून विधान परिषदेवर आमदार झाले. त्यावेळी दीपक कापसे, नाना झोडे यांच्यासह बरेच चतुर्वेदी समर्थक शिवसेनेत गेले. शिवसेना फुटीनंतर दुष्यंत चतुर्वेदी यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. पण कापसे, झोडे, कैकाडे हे उद्धव सेनेतच राहिले. कापसे हे उद्धव सेनेचे शहर प्रमुख म्हणून कार्यरत होते. आता कापसे, झोडे व कैकाडे यांच्या रुपात स्वत: किंवा घरात नगरसेवक पद असलेले तीन खंदे कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे त्यांच्या प्रभागात काँग्रेसची ताकद वाढणार आहे.
तिकीट कुणाला, महाकाळकर की कापसे ?
गेल्या निवडणुकीत प्रभाग ३० च्या एका जागेसाठी कापसे व महाकाळकर यांच्यात रस्सीखेच झाली. आ. ठाकरे यांनी महाकाळकर यांना ‘हात’ दिला व कापसेंचे तिकीट कटले. मंगळवारी प्रभाग आरक्षण सोडत आहे. यावेळीही २०१७ सारखीच परिस्थिती निर्माण झाली तर पुन्हा एकदा तिकीट कुणाला, महाकाळकर की कापसे असा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
उद्धव सेनेचे नागपूरवर लक्ष नाही
उद्धव सेनेचे मुंबईचे नेतृत्व नागपूरवर लक्ष नाही. नेते मुंबईहून येतात व उपदेश देऊन निघून जातात. त्यामुळे येथे उद्धवसेना वाढण्याची शक्यता नाही. गैरसमजातून आम्हाला इच्छा नसतानाही शिवसेनेत जावे लागे होते. अनेक पक्षांनी ऑफर दिली होती. पण आमच्या मनात, रक्तात काँग्रेस आहे. काँग्रेसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे आम्ही काँग्रेसमध्ये परत आलो आहोत, अशी प्रतिक्रिया दीपक कापसे यांनी व्यक्त केली.
भाजपशी लढण्याची ऊर्जा मिळेल
"महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन माजी नगरसेवक काँग्रेसमध्ये परत आले आहेत. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी हे चांगले संकेत आहेत. या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला आणखी आत्मविश्वासाने जनतेसमोर उभा राहण्याची तसेच भाजपशी लढण्यासाठी नवी ऊर्जा मिळेल."
- आ. विकास ठाकरे, शहर अध्यक्ष, काँग्रेस