कामगार संघटनांचे उद्गाते रामभाऊ रुईकरांचा पडला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:20 IST2021-01-13T04:20:04+5:302021-01-13T04:20:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राजकीय लाभ नसेल तर राजकीय पक्ष सोडाच इतर संघटनांही फिरकत नाहीत. याचा जागता पुरावा ...

कामगार संघटनांचे उद्गाते रामभाऊ रुईकरांचा पडला विसर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजकीय लाभ नसेल तर राजकीय पक्ष सोडाच इतर संघटनांही फिरकत नाहीत. याचा जागता पुरावा म्हणजे कामगार केसरी रामभाऊ रुईकर होत. शुक्रवारी त्यांची १२६वी जयंती होती. शासन, प्रशासन, राजकीय पक्ष आणि ज्यांच्यासाठी त्यांनी सत्तेचे मुकुट नाकारले त्या कामगार संघटनांनाही रामभाऊंविषयी कृतज्ञतेचे विस्मरण पडल्याचे जयंतीदिनी स्पष्ट झाले.
स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची भूूमिका बजावत असतानाच, त्यांनी उचललेली चळवळीची मशाल कामगारवर्गाच्या उत्थानासाठी महत्त्वाची मानली जाते. कामगार संघटनांचे उद्गाते म्हणूनच त्यांची अवघ्या भारतभरात ओळख आहे. त्यांच्याच पुढाकाराने ब्रिटिश सरकारला कामगार कायदे पारित करावे लागले आणि आज ते कामगार कायदे आहेत किंवा सुधारले जात आहेत, त्याचे अध्वर्यू रामभाऊ रुईकर होते आणि त्यामुळेच त्यांना कामगार केसरी ही पदवी बहाल झाली. मात्र, लाेणी मिळाले की दुधाला आणि दूध मिळाले की गाईला कोण पुसतो, अशी ही स्थिती आहे. महाल परिसरात चिटणवीस पार्क येथे रामभाऊ रुईकर यांचा कामगारांचा आवाज बुलंद करणाऱ्या आविर्भावात असलेला पूर्णाकृती पुतळा १९६६ साली तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण व राज्याचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते लोकार्पित झाला. पुतळा उभारून काम फत्ते झाले. नंतर काही काळ शासन, प्रशासनाकडून जयंती-पुण्यतिथीदिनी सोपस्कार पार पाडले गेले. मात्र, आता ते सोपस्कारही संपल्याचे निदर्शनास येत आहेत. ज्या काँग्रेसचे ते कार्यकर्ते होते, त्या काँग्रेसलाही विशेष असे सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे, याच परिसरात काँग्रेसचे मुख्यालय आहे. कदाचित सुभाषबाबूंसोबत ते फॉरवर्ड ब्लॉकमध्ये सामील झाल्याने काँग्रेसच्या लेखी ते काँग्रेसी नसावेत, असा संशय यामुळे उत्पन्न होतो. केवळ इंटकतर्फे जयंतीला आदरांजली वाहण्यात आली, हे विशेष.
न्यायाधीश ते मुख्यमंत्रिपदही नाकारले
रामभाऊ रुईकर हिदायततुल्ला यांच्यासोबत नागपूर हायकोर्टात वकिली करत. हिदायततुल्ला नंतर उपराष्ट्रपती झाले. त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी पं. नेहरू, सुभाषबाबूंसारखे लोक नागपुरात येत असत. सरदार पटेलांनी तत्कालीन मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची ऑफरही दिली होती. मात्र, कामगारांच्या सेवेतच रस असल्याचे सांगत, त्यांनी ते पद नाकारले होते. न्यायाधीश बनण्यातही त्यांनी नकार दर्शविला होता. कामगारांच्या सेवेत स्वत:ला वाहून घेणाऱ्या या कामगार केसरीचा सगळ्यांनाच विसर पडावा, ही एक शोकांतिका आहे.
आम्ही सांगतो तेव्हा साफसफाई
जयंती व पुण्यतिथी असते तेव्हा आम्हीच महापालिकेकडे पंधरा दिवस आधी जातो आणि पेंटिंग-साफसफाई करण्यास सांगतो. महापौर असताना प्रवीण दटके यांनी या स्थळाचे सौंदर्यीकरण केले. मात्र, त्यांच्यानंतर महापालिकेला कुठलेच सोयरसुतक राहिले नाही. काँग्रेस असो वा अन्य कुठलाही पक्ष आणि कोणत्याही कामगार संघटनांना रामभाऊ रुईकरांविषयी कृतज्ञतेचा विसर पडलेला आहे, असेच दिसते.
- मुकुंद मुळे, सचिव - राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक)
............