खुशखबर! पेंच व्याघ्र प्रकल्पातही होणार रात्रीचे वन पर्यटन; १७ पासून प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2022 18:30 IST2022-05-11T18:22:30+5:302022-05-11T18:30:20+5:30
या संदर्भातील मार्गदर्शक सूचना १७ मे पूर्वी महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जाणार असल्याची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ल यांनी दिली आहे.

खुशखबर! पेंच व्याघ्र प्रकल्पातही होणार रात्रीचे वन पर्यटन; १७ पासून प्रायोगिक तत्त्वावर प्रारंभ
नागपूर : पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत बफर झोन म्हणून समाविष्ट असलेल्या नागलवाडी व पवनी (वन्यजीव) एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्रामध्ये १७ मे पासून रात्रीचे वन पर्यटन करण्याचा निर्णय झाला आहे.
राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, पेंच व्याघ्र प्रकल्पात ४८३.९६ चौ. कि.मी. क्षेत्र बफर झोन म्हणून समाविष्ट झाले आहे. यामधील २०२ चौ. कि.मी. बफर क्षेत्राकरिता नागलवाडी व पवनी (वन्यजीव) एकसंघ नियंत्रण वनपरिक्षेत्र आहे. हे क्षेत्र वन्यजीव अभयारण्य किंवा राष्ट्रीय उद्यानाचा भाग नाही. यामुळे येथे असलेल्या समस्यांवर मात करण्यासाठी हा उपक्रम पेंच प्रकल्पाने हाती घेतला आहे. या पर्यटनासाठी शुल्क असून, अटी आणि नियमांचे पालनही पर्यटकांना करावे लागणार आहे. या संदर्भातील मार्गदर्शक सूचना १७ मे पूर्वी महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जाणार असल्याची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ल यांनी दिली आहे.
तिहेरी उद्देश
हे पर्यटन सुरू करण्यामागे वन विभागाचा तिहेरी उद्देश आहे. बफर क्षेत्र असल्याने या क्षेत्रात अवैध वृक्षतोड, शिकार, अवैध चराई, आदी समस्या आहेत. त्या नियंत्रणात याव्यात, वन पर्यटनातून वनसंरक्षणाला चालना मिळावी, पर्यटकांना निसर्गानुभव देण्यासोबतच वनसंरक्षणाच्या कामात स्थानिकांना रोजगार उपलब्ध निर्माण करून देण्यासाठी या दोन ठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू केला जात आहे.
असे असेल पर्यटन
पवनी आणि नागलवाडी या दोन्ही ठिकाणी रात्री ८ ते रात्री १२ वाजेपर्यंत रात्र गस्त आणि सायंकाळी ६ ते सकाळी ५ वाजेपर्यंत मचानावर रात्रीच्या निसर्गानुभवाची संधी आहे. यासाठी दोन मचान उपलब्ध असतील. यासोबतच चोरबाहुली, खुर्सापार, सिल्लारी आणि नागलवाडी येथे सकाळी ६.३० ते सायंकाळी ६.३० अशी पर्ण दिवसांची सफारी असणार आहे.