सव्वा दोन वर्षांत पहिल्यांदाच नागपुरात ‘नर्व्हस फोर्टीन’, एप्रिल महिना ठरला रक्तरंजित
By योगेश पांडे | Updated: May 1, 2025 06:13 IST2025-05-01T06:13:24+5:302025-05-01T06:13:54+5:30
भर रस्त्यांवर अनेक हत्या : पोलिसांची यंत्रणा हतबल की नियोजनात होतेय गल्लत?

सव्वा दोन वर्षांत पहिल्यांदाच नागपुरात ‘नर्व्हस फोर्टीन’, एप्रिल महिना ठरला रक्तरंजित
नागपूर : मागील काही दिवसांपासून नागपुरातील कायदा व सुव्यवस्थेला गुंडांकडून खुलेआम आव्हान दिले जात आहे. विशेषत: एप्रिल महिना तर पोलिसांच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरला. एका महिन्यात शहरात तब्बल १४ हत्या झाल्या. यातील अनेक हत्यांच्या घटना तर भर रस्त्यांवर झाल्या व त्यात कुख्यात गुंड सहभागी होते. २०२३ सालापासूनची आकडेवारी पाहिली तर एका महिन्यात सर्वांत जास्त हत्येचा हा सर्वाधिक आकडा ठरला. २० महिन्यांअगोदर ऑगस्ट २०२३ मध्ये १३ हत्यांची नोंद झाली होती. एका अर्थाने एप्रिल हा शहरासाठी व पोलिस विभागासाठी ‘नर्व्हस फोर्टीन’चाच महिना ठरला.
३ एप्रिल रोजी सोहेल खानची भर बाजारात हत्या झाली होती. त्यानंतर शहरात सातत्याने हत्यांचा क्रम सुरू आहे. ३ एप्रिलपासून ते ३० एप्रिलपर्यंत शहरात १३ हत्यांची नोंद झाली. तसे पाहिले तर २७ दिवसांत एका दिवसाआड एक हत्या झाली. या घटना मानकापूर, हुडकेश्वर, सीताबर्डी, अंबाझरी, यशोधरा नगर, पारडी, पाचपावली, जरीपटका, कोतवाली, वाडी पोलिस ठाणे परिसरात घडल्या. धरमपेठेत तर गुन्हेगारांनी टोळीयुद्धातून सोशा कॅफेच्या मालकाची गोळ्या मारून हत्या केली. यातील हिरणवार टोळीतील अनेक आरोपींना पकडण्यात यश आले असले तरी शहरातील गुन्हेगारांवर मात्र वचक बसलेला नाही हे या घटनांतून स्पष्ट होत आहे.
गुन्हेगारांवर वचक नाहीच
१३ पैकी ७ हत्या या भर रस्त्यावर, वर्दळीच्या ठिकाणी किंवा अगदी चौकात झालेल्या आहेत. जरीपटक्यातील ट्रकचालकाची हत्या तर चौकात झाली होती. पोलिसांनी मागील १० दिवसांत कोम्बिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारांची झाडाझडतीदेखील घेतली. अंबाझरीतील डीबी पथकदेखील बरखास्त केले. मात्र, तरीदेखील गुन्हेगारांवर वचक आला नसल्याचेच चित्र आहे. जानेवारी २०२३ सालापासून सहा महिन्यांत हत्यांची संख्या १० किंवा त्याहून अधिक होती. मात्र, या एप्रिलने उच्चांक गाठला.
दहाहून अधिक हत्या झालेले महिने (२०२३ पासून)
महिना : हत्या
जानेवारी २०२३ : १०
ऑगस्ट २०२३ : १३
फेब्रुवारी २०२४ : ११
जून २०२४ : ११
ऑक्टोबर २०२४ : १०
एप्रिल २०२५ : १४
तारीख : पोलिस ठाणे : हत्या
३ एप्रिल : मानकापूर : सोहेल खान याची गोळ्या झाडून भर बाजारात हत्या.
९ एप्रिल : सीताबर्डी : सागर मसराम, लक्ष्मण गोडिया या गुन्हेगारांची गुंडाकडून हत्या.
९ एप्रिल : हुडकेश्वर : डॉ. अर्चना अनिल राहुले यांची डॉक्टर पतीनेच केली हत्या.
१२ एप्रिल : हुडकेश्वर : वेदांत खंडाते या विद्यार्थ्याची मित्रानेच कोल्ड्रिंकमध्ये विष देऊन केली हत्या.
१२ एप्रिल : यशोधरानगर : भांडणात मध्यस्थी करणाऱ्या नईम अन्सारी नावाच्या तरुणाची हत्या.
१४ एप्रिल : पारडी : जितेंद्र जयदेव याची क्षुल्लक वादातून हत्या.
१५ एप्रिल : अंबाझरी : कॅफेचालक अविनाश भुसारीची मध्यरात्री गोळ्या घालत हिरणवार टोळीकडून हत्या.
१६ एप्रिल : यशोधरानगर : ताराचंद प्रजापती याची मेहुण्यानेच केली हत्या.
१९ एप्रिल : कपिलनगर : अंकुश रामाजी कडू या प्रॉपर्टी डीलरची भर रस्त्यावर हत्या.
२१ एप्रिल : पाचपावली : अनैतिक संबंधांतून शेरा नावाच्या व्यक्तीची रजत उकेकडून भर रस्त्यात हत्या.
२४ एप्रिल : कोतवाली : गंगाबाई घाटाजवळ जुन्या वादातून नितेश दुपारे या तरुणाची भर रस्त्यात हत्या.
२७ एप्रिल : जरीपटका : ट्रक ओव्हरटेक करण्यावरून भर चौकात ट्रकचालक वंश डाहारेची हत्या.
३० एप्रिल : वाडी : दारूचा ग्लास खाली पडल्याने सूरज भलावीची हत्या.