आरएसओव्हीवर मध्य भारतात पहिलीच शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 11:22 IST2020-06-17T11:19:54+5:302020-06-17T11:22:01+5:30
‘आरएसओव्ही’वर ‘क्लोजर डिव्हाईज’च्या सहाय्याने शस्त्रक्रिया मध्य भारतात पहिल्यांदाच करण्यात आली.

आरएसओव्हीवर मध्य भारतात पहिलीच शस्त्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : भंडारा येथील २३ वर्षीय महिलेची प्रसूतीनंतर महिनाभरात प्रकृती अत्यंत खालवली. हृदयाचे कार्यान्वयन बिघडल्याने यकृत व मूत्रपिंड यासारखे अवयवदेखील निकामे होऊ लागले होते; शिवाय रक्तातील प्लेटलेट्सची संख्यादेखील सामान्यापेक्षा कमी झाल्या होत्या. हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हृषिकेश उमाळकर यांनी विविध तपासण्या केल्या असता अत्यंत दुर्मिळ असा ‘आरएसओव्ही’ म्हणजे ‘रप्चर सायनस ऑफ वल्साल्वा’ हा विकार असल्याचे निदान केले. यावर इंटरव्हेंशनल तंत्राचा वापर करून हृदयातील महाधमनीचे छिद्र बुजविले. महिलेला जीवनदान दिले. मध्य भारतातील ‘आरएसओव्ही’वर अशा पद्धतीची ही पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे बोलले जाते.
‘आरएसओव्ही’ हा जन्मत: आढळणारा दोष आहे. हजार बालकांपैकी पाच बालकांना जन्मत: हृदयात काही दोष आढळतात. त्यापैकी ०.५ टक्के बालकांना ‘आरएसओव्ही’ हा जन्मदोष हृदयात आढळतो. जर फार मोठा आघात झाला तर ‘आरएसओव्ही’मुळे गुंतागुंत निर्माण होते. या महिलेच्या प्रसूतीदरम्यान तिच्यातील ‘आरएसओव्ही’मुळे गुंतागुंत निर्माण झाली होती.
डॉ. उमाळकर यांनी सांगितले, हृदयातून शरीराच्या विविध अवयवांमध्ये शुद्ध रक्ताचे वहन करणारी धमनी म्हणजे अॅओर्टाला(महाधमनी)जन्मत: आघात झालेला असतो. रक्त विविध अवयवांकडे न जाता हृदयाच्या उजव्या कप्प्यात(राईट चेंबर)मध्ये जमा होते. शरीराच्या अन्य अवयवांना पुरेसे रक्त मिळत नाही.
परिणामी, रुग्णाचे अन्य अवयव निकामी होऊ लागतात. या महिलेचेही अवयव हळूहळू निकामे होऊ लागले होते. त्यामुळे एका महिन्याच्या बाळाच्या आईचे प्राण धोक्यात आले होते. यावरील उपचारासाठी ‘ओपन हार्ट सर्जरी’ हा पर्याय असतो. परंतु महिलेचे निकामी होत असलेल्या अवयवांमुळे ही शस्त्रक्रिया करणे धोकादायक होते. यामुळे इंटरव्हेंशनल तंत्राचा वापर करण्याचे ठरविले.
शरीरात केलेल्या छोट्या छिद्रातून धमनीद्वारे आत स्टेंटच्या मदतीने ‘क्लोजर डिव्हाईस’ची छत्री महाधमनीच्या छिद्रापर्यंत पोहचविण्यात आली. या छत्रीच्या सहाय्याने हृदयातील महाधमनीचे छिद्र बुजविण्यात आले. या तंत्राद्वारे कुठल्याही मोठ्या चिऱ्याशिवाय महाधमनी आणि उजव्या कप्प्यादरम्यानचे छिद्र बंद करण्यात यश आले, असेही ते म्हणाले.
ही प्रक्रिया डॉ. हृषिकेश उमाळकर यांनी डॉ. महेश फुलवानी यांच्यासह यशस्वीरीत्या पार पाडली. एका आठवड्यात रुग्णाचे सगळे अवयव सामान्यपणे कार्यान्वित झाले. जूनच्या पहिल्या आठवड्यात तिला इस्पितळातून सुटीही मिळाली.
मध्य भारतात ही पहिल्यांदाच शस्त्रक्रिया
‘आरएसओव्ही’वर ‘क्लोजर डिव्हाईज’च्या सहाय्याने अशाप्रकारची प्रक्रिया मध्य भारतात पहिल्यांदाच करण्यात आली. एक महिन्याच्या बाळाच्या आईचा जीव वाचला याचे समाधान आहे.
- डॉ. हृषिकेश उमाळकर, हृदयरोगतज्ज्ञ