चार वर्षांअगोदर सौंदर्यीकरणात प्रथम पुरस्कार, आता पुलावर झाला हाहाकार
By योगेश पांडे | Updated: November 27, 2022 22:53 IST2022-11-27T22:51:36+5:302022-11-27T22:53:27+5:30
बल्लारपूर रेल्वेस्थानकावर झालेल्या अपघातानंतर रेल्वे यंत्रणेच्या कार्यप्रणालीवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

चार वर्षांअगोदर सौंदर्यीकरणात प्रथम पुरस्कार, आता पुलावर झाला हाहाकार
नागपूर : बल्लारपूर रेल्वेस्थानकावर झालेल्या अपघातानंतर रेल्वे यंत्रणेच्या कार्यप्रणालीवरदेखील प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. चार वर्षांअगोदर रेल्वे मंत्रालयाकडून बल्लारपूर रेल्वेस्थानकाला सौंदर्यीकरणात देशात प्रथम पुरस्कार मिळाला होता. सौंदर्यीकरणावर प्रशासनाने इतके जास्त लक्ष दिले की प्रत्यक्ष पुलाच्या अवस्थेकडे मात्र दुर्लक्ष होत गेले. त्याची परिणिती अपघातामध्ये झाली.
२०१८ साली केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सर्जनशीलतेसह सौंदर्यीकरणासंदर्भात देशपातळीवर स्पर्धा घेतली होती. त्यात वेगवेगळ्या झोनच्या रेल्वेस्थानकांकडून नामांकन मागविण्यात आले होते. यात स्थानिक कलाकारांचीदेखील मदत घेण्यात आली होती. या स्पर्धेत देशभरातील ११ झोनमधून ६२ नामांक प्राप्त झाले होते. यात बल्लारपूर व चंद्रपूर या रेल्वेस्थानकांना प्रथम पुरस्कार मिळाला होता.
यानंतर मधुबनी, मदुराई, गांधीधाम, कोटा, सिकंदराबाद ही रेल्वेस्थानके होती. बल्लारपूर रेल्वेस्थानकाला सर्वोत्कृष्ट कला व नूतनीकरण झालेले सर्वोत्कृष्ट स्थानक म्हणून प्रथम पुरस्कार मिळाला होता. मात्र पुलाच्या अवस्थेकडे या नूतनीकरणात भर देण्यात आला नव्हता का तसेच चारच वर्षांत नूतनीकरण जीवघेणे कसे काय झाले, असा प्रश्न उपस्थित होत आहे.