लोकमत न्यूज नेटवर्ककुही : शेतात गवत आणायला गेलेल्या सासऱ्याला एकटे पाहून जावयाने त्याच्यावर पाठीमागून धारदार शस्त्राने वार करीत त्याची हत्या केली. ही हत्या कौटुंबिक वादातून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले असून, पोलिसांनी आरोपी जावयास अटक केली आहे. ही घटना वेलतूर (ता. कुही) पोलिस ठाण्याच्या हद्दीतील परसोडी (राजा) शिवाराम बुधवारी (दि. १) सकाळी १० ते ११ वाजताच्या दरम्यान घडली.
देवराव बळीराम ठाकरे (६३, रा. परसोडी राजा, ता. कुही) असे मृत सासऱ्याचे तर विलास चमरू कोलते (४२, रा. तांडा, ता. मौदा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी जावयाचे नाव आहे. देवराव यांची थोरली मुलगी ज्योती आणि विलास या दोघांचे लग्न १८ वर्षापूर्वी झाले आहे. त्या दोघांना आकाश नावाचा मुलगा आणि वैशाली नावाची मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. विलासला दारूचे व्यसन असल्याने तो ज्योतीला सतत मानसिक व शारीरिक त्रास द्यायचा. तो मजुरीचे सर्व पैसे दारू पिण्यात खर्च करायचा आणि ज्योतीला रोज मारहाण करायचा. त्यामुळे त्याच्या जाचाला कंटाळून ज्योती दोन्ही मुलांसह घरगुती साहित्य घेऊन माहेरी परसोडी (राजा) येथे राहायला आली.
देवराव बुधवारी सकाळी परसोडी (राजा) शिवारातील राजू घोडमारे यांच्या शेतात गुरांसाठी गवत आणायला गेले होते. काही वेळाने विलास त्यांच्या मागे गेला. ते शिवारात एकटेच असल्याचे पाहून विलासने मागून जात त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाल्याने वेलतूर पोलिसांनी देवराव यांचा धाकटा भाऊ अंबादास बळीराम ठाकरे (६०, रा. परसोडी राजा) यांच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता (बीएनएस) १०३ अन्वये गुन्हा दाखल केला असून, तपास ठाणेदार प्रशांत मिसाळे करीत आहेत.
विलासही आला सासरी
पत्नी ज्योती माहेरी परसोडी (राजा) येथे राहायला आल्याने तीन महिन्यांपूर्वी विलासही त्याच्या सासरी परसोडी (राजा) येथे राहायला आला. सासरे देवराव यांनी त्यांच्या घराशेजारी ज्योती व विलासला किरायाने खोली करून दिली. त्या खोलीत दोघांसह त्यांची दोन्ही मुले राहतात. दोन्ही मुले पचखेडी (ता. कुही) येथील शाळेत शिक्षण घेतात. तो गावात शेतीची मिळेल ती कामे करून उपजीविका करायचा.
आरोपीचे समर्पण
आरोपी विलासने देवराव यांच्यावर शस्त्राने वार केले आणि त्यांना जखमी अवस्थेत शेतातच सोडून कुणाला काहीच न सांगता वेलतूर पोलिस ठाणे गाठले. त्याने घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला आणि पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून पाहणी व पंचनामा केला. तोपर्यंत त्यांच्या हत्येची माहिती कुणालाही नव्हती. आधीच गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक केली. उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन यांची घटनेची संपूर्ण माहिती जाणून घेतली.
Web Summary : In Parshodi, a man murdered his father-in-law, due to domestic disputes. The accused, frustrated by marital issues and alcohol addiction, attacked with a sharp weapon. He confessed at the police station.
Web Summary : पारशोडी में, एक व्यक्ति ने घरेलू विवादों के कारण अपने ससुर की हत्या कर दी। आरोपी, वैवाहिक समस्याओं और शराब की लत से परेशान होकर, एक तेज हथियार से हमला किया। उसने पुलिस स्टेशन में अपराध कबूल कर लिया।