आधी मारहाण केली, नंतर विहिरीत फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:08 IST2021-03-26T04:08:23+5:302021-03-26T04:08:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून एका व्यक्तीला तिघांनी घरून उचलून नेले. त्याला बेदम मारहाण केली ...

First beaten, then thrown into a well | आधी मारहाण केली, नंतर विहिरीत फेकले

आधी मारहाण केली, नंतर विहिरीत फेकले

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून एका व्यक्तीला तिघांनी घरून उचलून नेले. त्याला बेदम मारहाण केली आणि नंतर विहिरीत टाकले. बुधवारी मध्यरात्रीनंतर इंदोरा बारा खोली भागात ही थरारक घटना घडली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली आहे.

मृताचे नाव शैलेश बोधिले असून तो इंदोरा बारा खोली परिसरातील श्रावस्ती नगर बुद्धविहार जवळ राहत होता. आरोपींची नावे दगडू ऊर्फ आशिष बागडे, जसपालसिंग संधुरी ऊर्फ मोनू प्राजी आणि

ऋषिकेश लांडगे आहे. ते जरीपटक्यातीलच रहिवासी आहेत. शैलेशच्या पुतण्यासोबत दोन दिवसांपूर्वी आरोपींचा वाद झाला होता. त्यावेळी शैलेशच्या पुतण्याने आरोपींना ‘हमको सब चलते’, असे म्हटले होते. त्याचा वचपा काढण्यासाठी बुधवारी मध्यरात्री आरोपी दारूच्या नशेत चूर होऊन शैलेशच्या घरी पोहोचले. त्यांनी शैलेशला घराबाहेर बोलवून तुझ्या पुतण्याला समजव, अन्यथा गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली. बाचाबाची वाढल्यानंतर आरोपीने शैलेशला जबरदस्तीने बाजूला नेले. तेथे त्याला बेदम मारहाण करून शैलेशला विहिरीत फेकले. दरम्यान, मध्यरात्र उलटूनही शैलेश घरी पोहोचला नसल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी जरीपटका पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपींनी त्याला जबरदस्तीने सोबत नेल्याची

माहिती दिली. पोलिसांनी लगेच आरोपीना त्यांच्या घरून ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता शैलेशला त्यांनी विहिरीत फेकल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने शैलेशचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला.

----

परिसरात तणाव

या घटनेमुळे सकाळपासून बारा खोली इंदोरा भागात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपींना विचारपूस केली. त्यानंतर अपहरण करून हत्या केल्याचा गुन्हा दाखल करून लांडगे वगळता दोघांना अटक केली. आरोपी लांडगे फरार आहे.

---

आरोपी गुंड वृत्तीचे

या गुन्ह्यातील आरोपी गुन्हेगारी वृत्तीचे आहेत. त्यांच्याविरुद्ध यापूर्वीचेही गुन्हे दाखल असल्याची माहिती ठाणेदार नितीन फटांगरे यांनी दिली.

---

Web Title: First beaten, then thrown into a well