नागपुरातील इटर्निटी मॉलमधील कपड्याच्या शोरूमला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2018 21:40 IST2018-05-29T21:40:25+5:302018-05-29T21:40:37+5:30
सीताबर्डी, व्हेरायटी चौकातील इटर्निटी मॉलच्या समोरील भागातील कपड्याच्या शोरूमला मंगळवारी सकाळी ५.३० वाजता लागलेल्या आगीत वायरिंग पूर्णपणे जळाली असून, कॅश काऊंटर आणि बिलिंग मशीन खाक झाली आहे.

नागपुरातील इटर्निटी मॉलमधील कपड्याच्या शोरूमला आग
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सीताबर्डी, व्हेरायटी चौकातील इटर्निटी मॉलच्या समोरील भागातील कपड्याच्या शोरूमला मंगळवारी सकाळी ५.३० वाजता लागलेल्या आगीत वायरिंग पूर्णपणे जळाली असून, कॅश काऊंटर आणि बिलिंग मशीन खाक झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, मॉलच्या महाराजबाग रोड भागातील एफबीबी (फॅशन अॅट किंग) नामक कपड्याच्या शोरूममधून धूर निघताना दिसला. धुरासोबत प्लास्टिक कोटिंगची इलेक्ट्रिक वायरिंग जळाल्याच्या वासामुळे मॉलच्या सुरक्षा रक्षकांचे लक्ष शोरूमकडे गेले. शोरूम कपड्याची असल्यामुळे या शोरूमसह मॉलमधील अन्य शोरूम आगीत सापडण्याची भीती सुरक्षा रक्षकांना वाटली. त्यांनी तात्काळ अग्निशमन विभागाला आगीची माहिती दिली. आगीमुळे शोरूमचे कॅश काऊंटर, बिलिंग मशीन, इलेक्ट्रिक डिस्प्ले, एलईडी टीव्ही, इलेक्ट्रिक पॅनल बोर्ड आणि केबल जळू लागले. भीषण आग पाहता घटनास्थळी अग्निशमन दलाच्या सात गाड्या पोहोचल्या. कर्मचाऱ्यांनी सकाळी ७ वाजता आगीवर नियंत्रण मिळविले. पारस जयस्वाल हे शोरूमचे संचालक असल्याची माहिती आहे.
प्रारंभिक तपासणीत आग इलेक्ट्रिक शार्ट सर्किटमुळे लागल्याची अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीत शोरूममधील सामानांसह वायरिंग जळाल्यामुळे सात लाख रुपयांच्या नुकसानीचा दावा करण्यात येत आहे.