मनपाच्या तक्रारीवरून विद्यार्थ्याविरुद्ध दाखल तो एफआयआर रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 22:40 IST2021-07-20T22:39:55+5:302021-07-20T22:40:40+5:30
Facebook FIR filed against the student rejected एका फेसबुक पेज पाेस्टमुळे सदर पोलिसांनी महानगरपालिकेच्या तक्रारीवरून मेकॅनिकल इंजिनियरिंगचा विद्यार्थी राहुल ताकसांडे याच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांतर्गत नोंदविलेला एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द केला.

मनपाच्या तक्रारीवरून विद्यार्थ्याविरुद्ध दाखल तो एफआयआर रद्द
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका फेसबुक पेज पाेस्टमुळे सदर पोलिसांनी महानगरपालिकेच्या तक्रारीवरून मेकॅनिकल इंजिनियरिंगचा विद्यार्थी राहुल ताकसांडे याच्याविरुद्ध विविध गंभीर गुन्ह्यांतर्गत नोंदविलेला एफआयआर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अवैध ठरवून रद्द केला. न्यायमूर्तीद्वय विनय देशपांडे व अमित बोरकर यांनी राहुलला हा दिलासा दिला.
राहुल ‘लिट मिम्स नागपूर’ नावाचे फेसबुक पेज संचालित करीत असून त्यावर त्याने ‘सांडपाण्याचा संचय व प्रदूषण कमी झाल्यामुळे नाग नदीचे पाणी नागपूर शहराला पिण्याकरिता वितरित केले जाऊ शकते’, अशी पाेस्ट टाकली होती. त्यामुळे महानगरपालिकेची बदनामी आणि कोरोना संक्रमणामुळे लागू मार्गदर्शक तत्त्वे व विविध आदेशांची पायमल्ली झाली, अशी तक्रार महानगरपालिकेचे जनमाहिती अधिकारी मनीष सोनी यांनी सदर पोलिसांकडे केली होती. त्यावरून राहुलविरुद्ध भादंवितील कलम १८८ (सरकारी अधिकाऱ्याच्या आदेशाचे उल्लंघन), ५०० (बदनामी करणे), ५०५-१-बी (समाजात दहशत पसरविणे), साथरोग कायद्यातील कलम ३ (या कायद्यांतर्गतच्या आदेशाचे उल्लंघन), आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील कलम ५४ (आपत्तीविषयी खोटी माहिती पसरविणे) व महाराष्ट्र पोलीस कायद्यातील कलम १४० (पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन)अंतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला होता. त्यामुळे राहुलने उच्च न्यायालयात याचिका दाखल करून हा एफआयआर अवैध ठरवून रद्द करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने या गुन्ह्यांचे विवरण लक्षात घेता, राहुलने कोणताही गुन्हा केला नाही आणि त्याची फेसबुक पेजवरील संबंधित पाेस्ट बेकायदेशीर नाही, असे निरीक्षण नोंदवून ही याचिका मंजूर केली. साेबतच, भविष्यातदेखील कायद्यांचा भंग होईल अशी कोणतीही पोस्ट प्रसिद्ध करू नकोस, असा सल्ला राहुलला दिला. राहुलतर्फे ॲड. अथर्व मनोहर यांनी कामकाज पाहिले.
फेसबुक पेज विनोदासाठी
‘लिट मिम्स नागपूर’ हे फेसबुक पेज विनोद, मिम्स व इतर मनोरंजनात्मक किस्से पोस्ट करण्यासाठी तयार केले आहे. नागरिकांपर्यंत बातमी पोहचविणे किंवा त्यांना इतर कोणतीही माहिती देणे, हा या पेजचा उद्देश नाही. त्यामुळे संबंधित सर्व गुन्हे अवैध आहेत, असे राहुलचे म्हणणे होते. मनपा व पोलिसांनी एफआयआर योग्य असल्याचा दावा केला, पण न्यायालयाला त्यात तथ्य आढळून आले नाही.