आर्थिक अडचणीने त्रस्त दाम्पत्याने संपविली जीवनयात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:08 IST2021-02-13T04:08:53+5:302021-02-13T04:08:53+5:30

उमरेड : आर्थिक चणचण, आजारपण आणि त्यातूनच उद‌्भवलेल्या कर्जबाजारीपणामुळे वैतागलेल्या उमरेड येथील दाम्पत्याने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. राजेश ...

The financially distressed couple ended their life | आर्थिक अडचणीने त्रस्त दाम्पत्याने संपविली जीवनयात्रा

आर्थिक अडचणीने त्रस्त दाम्पत्याने संपविली जीवनयात्रा

उमरेड : आर्थिक चणचण, आजारपण आणि त्यातूनच उद‌्भवलेल्या कर्जबाजारीपणामुळे वैतागलेल्या उमरेड येथील दाम्पत्याने विष प्राशन करून जीवनयात्रा संपविली. राजेश सोहनलाल गुप्ता (६०) आणि पत्नी संध्या राजू गुप्ता (५५) असे या दाम्पत्याचे नावे आहे. उमरेड बसस्थानक लगत असलेल्या महावैष्णवी कॉम्प्लेक्समधील ए-३०६ फ्लॅटमध्ये त्यांचे वास्तव्य होते. शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास ही हृदय हेलावून टाकणारी घटना उजेडात आली. दोघांनीही ‘मोनोसील’ नावाचे कीटकनाशक प्राशन केल्याचीही बाब तपासात पुढे आली आहे. दोघांचेही प्रेत त्यांच्या बेडरूममध्ये जमिनीवर पडले होते.

राजेश गुप्ता यांचे श्री संत जगनाडे महाराज व्यावसायिक संकुल येथे विजय ट्रेडर्स या नावाने हार्डवेअरचे दुकान आहे. विजय नावाचा मुलगा आणि स्रेहा नावाची मुलगी आहे. स्रेहाचा काही वर्षांपूर्वीच विवाह झाला. मागील काही वर्षांपासून राजेश आणि पत्नी संध्या दोघांच्याही प्रकृतीची समस्या उद‌्भवली. दुसरीकडे दुकानातूनही आर्थिक उत्पन्न फारसे नव्हते. यामुळे प्रपंच चालविणे मुश्किलीचे होत होते. राजेश आणि संध्या दोघांचाही स्वभाव मनमिळावू आणि हळवा होता. मुलगा विजय यास महिनाभरापासून नागपूर येथे खासगी नोकरी मिळाल्याने तो नागपूर येथे वास्तव्याला होता.

शुक्रवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास विजयने वारंवार आई-वडिलांच्या मोबाइलवर संपर्क केला. त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अशातच विजयने नातेवाइकांना याबाबत कळविले. त्यानंतर ही गंभीर घटना समोर आली. या प्रकरणाची माहिती मिळताच उमरेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उमरेड पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद करण्यात आली असून, तपास पोलीस निरीक्षक यशवंत सोलसे करीत आहेत.

मृत्यूपूर्वी दोन चिठ्ठ्या

राजेश गुप्ता आणि पत्नी संध्या यांनी दोन वेगवेगळ्या चिठ्ठ्या मृत्यूपूर्वी लिहून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. एका चिठ्ठीत ‘एडीओ साहेब, हम दोनो की बॉडी को मेडिकलमे दान कर देना, हमारी दोनो की आखरी इच्छा है’ असे यात नमूद आहे. या पत्रावर दोघांचीही नावे आणि स्वाक्षऱ्या आहेत. अन्य दुसरी चिठ्ठी ‘प्रिय बेटी स्रेहा’ असे लिफाफ्यावर नमूद करीत लिहून ठेवली आहे. यामध्ये ‘आम्हाला माफ करा’ असे यात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: The financially distressed couple ended their life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.