अखेर क्षयरोगाचा वॉर्ड सुरू
By Admin | Updated: March 16, 2015 02:26 IST2015-03-16T02:26:36+5:302015-03-16T02:26:36+5:30
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) काही अंतरावर असलेल्या छाती व क्षयरोग विभागाची स्थिती वाळीत टाकल्याप्रमाणेच होती.

अखेर क्षयरोगाचा वॉर्ड सुरू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) काही अंतरावर असलेल्या छाती व क्षयरोग विभागाची स्थिती वाळीत टाकल्याप्रमाणेच होती. या विभागाला ४२ व ४३ असे दोन वॉर्ड होते. ४२ क्रमांकाचा वॉर्ड महिलांसाठी तर ४३ क्रमांकाचा वॉर्ड पुरुषांसाठी होता. क्षयरोग हा संसर्गजन्य आजार आहे. यामुळे छाती रोगाच्या रुग्णाला याचा धोका होण्याची शक्यता अधिक असायची.
विभागप्रमुख डॉ. घोरपडे यांनी छाती रोगाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात या रुग्णासाठी वॉर्ड मिळाला. जुन्या वॉर्डातील मुनष्यबळ या नव्या वॉर्डात गेले. यामुळे क्षयरोगाचे दोन वॉर्ड सांभाळण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडले. परिणामी, महिला आणि पुरुषांना एकाच वॉर्ड क्र. ४३ मध्ये ठेवण्यात येऊ लागले. एकच प्रसाधनगृह असल्याने पुरुष आणि महिला रुग्णांना याचा वापर करताना अडचणीचे जात होते. जागोजागी टाईल्सही उखडल्या होत्या. रुग्णांच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन वर्षभरापूर्वी दुरुस्तीच्या नावाखाली हा वॉर्ड बंद करण्यात आला. बांधकाम विभागाने काम पूर्ण करायला बराच वेळ घेतला. यातच निधीअभावी गेल्या चार महिन्यांपासून कामही बंद होते.
विभागाचे डॉक्टर मेयो रुग्णालयात रुग्णांना रेफर करीत होते. परंतु तेथीलही वॉर्डही फुल्ल राहत असल्याने भरती कुठे करावे, हा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर आरोग्य विभागाच्या वॉर्डात रुग्ण ठेवण्यात येऊ लागले होते. परंतु हा वॉर्ड ‘एमडीआर’ रुग्णांसाठी राखीव असल्याने फारच गंभीर रुग्ण ठेवण्यात येत होते.
याविषयी ‘लोकमत’ने वारंवार वृत्त प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल अधिष्ठाता डॉ. निसवाडे यांनी घेतली. पदावर रुजू होताच त्यांनी बांधकाम विभागाला निधी उपलब्ध करून देत ‘वॉर्ड ४३’चे बांधकाम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सोमवार १६ मार्चपासून हा वॉर्ड सुरू होत आहे. (प्रतिनिधी)