सणासुदीचा हंगाम सुरू, खाद्यतेल महागले! गृहिणींच्या बजेटला फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 15:28 IST2025-08-06T15:25:16+5:302025-08-06T15:28:36+5:30
सोयाबीन, पाम, मोहरी, राइस ब्रान तेलाच्या दरात झपाट्याने वाढ : बजेटवर ताण वाढला

Festive season begins, edible oil becomes expensive! Housewives' budgets hit
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सणांचा हंगाम सुरू होताच घरगुती बजेटवर महागाईचा नवा फटका बसला आहे. रक्षाबंधन, महालक्ष्मीपूजन आणि गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात खाद्यतेलाची मागणी झपाट्याने वाढत असून, त्याचा थेट परिणाम दरवाढीवर झाला आहे. मागील काही दिवसांत सोयाबीन, पाम, मोहरी, राइस ब्रान तेलाच्या दरात प्रति किलो ४ ते १० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे प्रति किलो दर
खाद्यतेल जुलै ऑगस्ट
सोयाबीन १३६ १४०
राइस ब्रान १४० १४४
मोहरी १६० १७०
पाम १४० १४५
खोबरेल ४५० ५००
सूर्यफूल १६० १६०
शेंगदाणा १६० १६०
जवस १७० १७०
सण, बाजार आणि बजेट !
- सणाच्या उंबरठ्यावर दरवर्षीच तेल दरवाढीचा फटका सामान्य नागरिकांना बसतो. रक्षाबंधन, महालक्ष्मी पूजन आणि गणेशोत्सव या महत्त्वाच्या सणांमुळे बाजारात खाद्यतेलाची मागणी तीव्र झाली आहे.
- मिठाई, फराळाचे साहित्य, नमकीन, भजी, वडे आणि घरगुती उपयोगासाठी तेलाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे घाऊक व्यापाऱ्यांपासून ते किरकोळ विक्रेत्यांपर्यंत दरात चढाओढ सुरू आहे.
- तेलाच्या किमतीत झालेली वाढ 3 केवळ घरगुती खर्चावर परिणाम करत नाही, तर त्याचा संपूर्ण अन्नसाखळीवर परिणाम होतो. हॉटेल्स, मिठाई दुकाने, तळलेले पदार्थ विक्रेते यांच्यासाठीही ही परिस्थिती चिंतेची आहे.
- तेल हे रोजच्या वापरातील अत्यावश्यक वस्तू आहे. प्रति किलो ५ ते १० रुपयांपर्यंत वाढ म्हणजे महिन्याच्या शेवटी बजेट कोसळते. इतरही वस्तू महाग झाल्या आहेत. दरवर्षी तेल, साखर, ड्रायफ्रूट्स महाग होतात. सरकारने यावर लक्ष द्यावे, अशा गृहिणींच्या प्रतिक्रिया आहेत.
"सण जवळ येताच तेलाच्या मागणीत वाढ होते, हा दरवर्षीचा अनुभव आहे. नागपुरात तेलाच्या एकूण विक्रीपैकी ७० टक्के सोयाबीन तेल विकले जाते. जूनमध्ये १५० रुपये किलो असलेले सोयाबीन तेल जुलैमध्ये १३६ रुपयांपर्यंत कमी झाले आणि जुलैमध्ये पुन्हा १४० रुपयांपर्यंत वाढले. यासह पाम तेलाचे दर ५ रुपयांनी वाढून १४५ रुपयांवर पोहोचले. पुढील आठवड्यात आणखी दरवाढ होण्याची शक्यता आहे."
- अनिल अग्रवाल, खाद्यतेल विक्रेते, इतवारी.