निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2025 00:28 IST2025-11-02T00:27:16+5:302025-11-02T00:28:32+5:30
Nitin Gadkari Latest news: ‘एस. एन. विनोद – ८५ वर्षांची अनंत यात्रा’ या स्मारिकेचे प्रकाशन आणि सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून गडकरी बोलत होते.

निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
नागपूर : देशात काँग्रेसचे सरकार होते आणि मंचावर त्यावेळी काँग्रेसचे खासदार तसेच लोकमत एडिटोरियल बोर्डचे अध्यक्ष डॉ. विजय दर्डा उपस्थित होते. एस. एन. विनोद यांनी त्यावेळी सरकारच्या त्रुटींवर प्रकाश टाकला होता. त्यातून लोकमत व्यवस्थापनाचा निष्पक्षपणा आणि एस. एन. विनोद यांच्या परखड पत्रकारितेचा प्रत्यय यावा, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मांडले.
‘एस. एन. विनोद – ८५ वर्षांची अनंत यात्रा’ या स्मारिकेचे प्रकाशन आणि सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून गडकरी बोलत होते. ते पुढे म्हणाले, देशासमोर विचारभिन्नता ही समस्या नाही. पत्रकारांमध्ये निर्माण होत असलेली विचारशून्यता लोकशाहीसाठी घातक आहे.
एस. एन. यांच्या बेधडक पत्रकारितेचे कौतूक करताना गडकरी म्हणाले, आणीबाणीच्या काळात विनोदजी यांनी आपल्या संपादकीय लेखांमधून सरकारविरुद्ध बिनधास्त मतप्रदर्शन केले. त्यांनी ‘ बरोबर ते बरोबर आणि चुकीचे ते चुकीचे’ असे ठामपणे मांडत त्यांनी सरकारला आरसा दाखवला. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकाराचे हेच मुळ कर्तव्य आहे. आज देशाला निर्भीड आणि बेधडक पत्रकारितेची गरज आहे, असे म्हणत गडकरी यांनी एस. एन. विनोद यांच्या दिवंगत पत्नींचाही भाषणातून उल्लेख केला.
शनिवारी सायंकाळी प्रेस क्लबमध्ये आयोजित या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वनराईचे विश्वस्त डॉ. गिरिश गांधी, तर अतिथी म्हणून प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र, महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना एस. एन. विनोद यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक श्रद्धेय बाबूजी उपाख्य जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांनी आपल्याला ‘लोकमत समाचार’च्या संपादकपदाची जबाबदारी दिली. तुमच्या कामात कोणताही हस्तक्षेप होणार नाहीत, असा शब्दही त्यांनी दिला होता.
बाबूजी आणि त्यांच्यानंतर एडिटोरियल बोर्डचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. विजय दर्डा आणि लोकमतचे एडिटर ईन चिफ राजेंद्र दर्डा यांनीही हा शब्द पाळला. त्यांच्यामुळेच आपल्याला निष्पक्ष पत्रकारिता करण्याची संधी मिळाल्याचे एस. एन. विनोद यांनी सांगितले.
१०० कोटींचा दावा अन्...
एका लेखावरून १०० कोटींचा दावा लोकमतवर करण्यात आला. त्यावेळीदेखिल आपल्या पाठीशी बाबूजी आणि लोकमतचे व्यवस्थापन भक्कमपणे उभे होते. यामुळेच आपण परखड पत्रकारिता करू शकलो, असेही एस.एन. यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी म्हणाले, पूर्वीच्या काळात वृत्तपत्रांना त्यांच्या संपादकांच्या लेखनावरून ओळख मिळायची. ‘लोकमत’ला त्यांचे पहिले संपादक पद्मश्री पा. वा. गाडगीळ आणि ज्येष्ठ संपादक म. य. उपाख्य बाबा दळवी यांच्या संपादकीयांमुळे तर ‘लोकमत समाचार’ला एस. एन. विनोद यांच्या लेखांमुळे स्वतंत्र ओळख मिळाली.
प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांची गरज
ज्येष्ठ पत्रकार आणि प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र यांनी आपल्या छोटेखानी भाषणातून कार्यक्रमाची भूमीका मांडली. तर, ज्येष्ठ पत्रकार राहुल पांडे यांनी पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन होत असल्याबद्द्ल चिंता व्यक्त करून आज देशाला प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन पत्रकार पूर्णिमा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ पत्रकार जोसेफ राव यांनी केले. कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते.