राज्यभरातील शेतकरी आज जाळणार मूठभर कापूस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2020 00:54 IST2020-05-22T00:49:51+5:302020-05-22T00:54:27+5:30
राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांप्रति शासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी २२ मे ला राज्यभर मूठभर कापूस जळून शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यभर प्रतिकात्मक आंदोलन केले जाणार आहे.

राज्यभरातील शेतकरी आज जाळणार मूठभर कापूस
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांप्रति शासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी २२ मे ला राज्यभर मूठभर कापूस जळून शेतकरी संघटनेच्यावतीने राज्यभर प्रतिकात्मक आंदोलन केले जाणार आहे.
या आंदोलनासंदर्भात एका पत्रकातून माहिती देताना शेतकरी संघटनेचे प्रवक्ते राम नेवले यांनी शासनाच्या या धोरणाचा निषेध केला. ते म्हणाले, शेतकऱ्यांची पेरणीची वेळ जवळ येऊनही सीसीआयकडून कापूस मोठ्या प्रमाणावर खरेदी झालेला नाही. विदर्भ, मराठवाडा, खानदेश या तिन्ही विभागामध्ये शेतकरी व ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था कापसावर अवलंबून आहे. यावर्षी कोरोनामुळे शासनाने उशिरा कापूस खरेदी सुरू केली. फारच कमी केंद्रावर कापूस खरेदी सुरू आहे. दिवसभरात फक्त २० गाड्या कापूस खरेदी होतो. अशीच संथ गती राहिली तर शेतकऱ्यांच्या घरी असलेला ४० टक्के कापूस विकला जाणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचण जाईल व पेरणीसाठी पैसे येणार नाही.
सीसीआयने मोठ्या प्रमाणावर खरेदी केंद्र वाढवावे, शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस त्वरित खरेदी करून चुकारे द्यावे, अशी मागणी सरकारकडे केली आहे. शासनाच्या उदासीनतेचा निषेध करण्यासाठी २२ मे ला सकाळी ११ वाजता शेतकऱ्यांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळून आपल्या दारासमोर किंवा ५ शेतकरी एकत्र येऊन मूठभर कापूस जाळावा, असे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे.