अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू : संतप्त नागरिकांचा ‘रास्ता रोको’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 12:08 AM2019-07-26T00:08:57+5:302019-07-26T00:14:44+5:30

कोळसा घेऊन वेगात जाणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा-पारशिवनी मार्गावरील भानेगाव टी-पॉईंटजवळ गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी ‘रास्ता रोको’ केला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अडीच तास ठप्प होती. यात पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Farmer dies in accident: 'Stop the road' of angry citizens | अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू : संतप्त नागरिकांचा ‘रास्ता रोको’

अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू : संतप्त नागरिकांचा ‘रास्ता रोको’

Next
ठळक मुद्देअडीच तास वाहतूक ठप्पनागपूर जिल्ह्यातील खापरखेडा-पारशिवनी मार्गावरील भानेगाव टी-पॉईंटजवळ घडला अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (खापरखेडा) : कोळसा घेऊन वेगात जाणाऱ्या ट्रकने मोटरसायकलला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना खापरखेडा (ता. सावनेर) पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापरखेडा-पारशिवनी मार्गावरील भानेगाव टी-पॉईंटजवळ गुरुवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी ‘रास्ता रोको’ केला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अडीच तास ठप्प होती. यात पोलीस अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
छगन रामकृष्ण काळे (३७, रा. सिंगोरी, ता. पारशिवनी)असे मृताचे नाव आहे.ते एमएच-४०/बीएच-७३०१ क्रमांकाच्या मोटरसायकलने सिंगोरीला जात होते. विरुद्ध दिशेने कोळसा घेऊन येणाऱ्या एमएच-४०/एन-४३९५ क्रमांकाच्या ट्रकने डाव्या भागाने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे छगन ट्रकवर आदळून रोडच्या कडेला फेकल्या गेले तर दुचाकी ट्रकमध्ये अडकली. ती आठ फुटांपर्यंत घासत गेली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच ट्रकचालक उमाकांत बापट, रा. पाटणसावंगी, ता. सावनेर याने घटनास्थळाहून पळ काढला.
काही वेळातच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली; शिवाय चार पोलीस कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले. या मार्गावरील कोळशाची ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी संतप्त नागरिकांनी रेटून धरली. गर्दी वाढल्याने याला आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे दोन्ही बाजूंकडील वाहतूक ठप्प झाली. परिणामी, पारशिवनी व खापरखेडा पोलीस ठाण्यातून कुमक बोलावण्यात आली. त्यातच ट्रकचालक व मालकास घटनास्थळी आणण्याची मागणी रेटून धरली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच ‘आरसीपी’ (दंगा नियंत्रक) पथकाला पाचारण करण्यात आले.
काही वेळाने ठाणेदार चंद्रकांत मदने यांनी मृतांच्या कुटुंबीयांना भानेगाव ग्रामपंचायत कार्यालयात बोलावून त्यांच्याशी नुकसान भरपाईबाबत चर्चा केली. यावेळी सरपंच रवींद्र चिखले, रणजित गजभिये, रा. डोरली, प्रकाश डोकमी, रा. पारशिवनी यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये गोळा करून २० हजार रुपयांची मदत मृताच्या कुटुंबीयांना केली. ट्रकमालक लाला गुप्ता, रा. वलनी, ता. सावनेर यास बोलावूनही तो आला नव्हता. त्यानंतर दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.
‘एसडीपीओं’ धक्काबुक्की
माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण कुणीही कुणाचे ऐकत नव्हते. त्यातच मृताच्या नातेवाईकापैकी एकाने ट्रकच्या टायरमधील हवा सोडण्याचा प्रयत्न केला. ही बाब लक्षात येताच एसडीपीओ पुज्जलवार यांनी त्याची कॉलर पकडून ओढले. हा प्रकार बघताच हिंगणा येथील एका तरुणाने पुज्जलवार यांना जोरात धक्का देत बाजूला केले. काहींनी ठाणेदाराशी वाद घालायला सुरुवात केली. यात संजय पुज्जलवार यांना धक्काबुक्की करण्यात आली.
प्रकल्पग्रस्त शेतकरी
मृत छगन काळे यांची सिंगोरी शिवारात शेती होती. ती वेकोलिच्या कोळसा खाणीसाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले आहेत. मोठा मुलगा पाच तर लहान दोन वर्षांचा आहे. खाणीच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांना व त्यांच्या लहान भावाला वेकोलिमध्ये नोकरी मिळणार होती. मात्र, त्याआधाीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या डोक्यात हेल्मेट असते तर कदाचित ते बचावले असते, असेही काहींनी सांगितले.

Web Title: Farmer dies in accident: 'Stop the road' of angry citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.