प्रसिद्ध साहित्यिक अनिल नितनवरे यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 20:05 IST2018-01-23T19:54:08+5:302018-01-23T20:05:16+5:30
मराठीचे गाढे अभ्यासक, साहित्यिक, कवी, प्रयोगशील एकांकिकाकार तथा समीक्षक प्रा.अनिल नितनवरे (५३) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुपारी १ वाजताच्या सुमारास निधन झाले.

प्रसिद्ध साहित्यिक अनिल नितनवरे यांचे निधन
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मराठीचे गाढे अभ्यासक, साहित्यिक, कवी, प्रयोगशील एकांकिकाकार तथा समीक्षक डॉ. अनिल नितनवरे (५३) यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुपारी १ वाजताच्या सुमारास निधन झाले. साकोली येथील मनोहरभाई पटेल महाविद्यालयात ते मराठीचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत होते. ज्या मराठी भाषेसाठी त्यांनी स्वत:ला समर्पित केले होते, त्याचेच अध्यापन कार्य करत वर्गखोलीतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या अचानक निघून जाणे साहित्याप्रमाणे सामाजिक वर्तुळालादेखील चटका लावून गेले आहे.
प्रा. नितनवरे हे दैनंदिनीप्रमाणे मंगळवारी महाविद्यालयात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी ते वर्गात गेले. काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. त्यांच्यामागे आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी , तीन बहिणी, भाऊ आहेत. त्यांच्या पार्थिवावर बुधवारला दुपारी १२ वाजता नागपूर येथे जयताळा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
मूळचे नागपूर जिल्ह्यातील असलेले नितनवरे सुरुवातीपासूनच मराठीसाठी समर्पित होते. १९८५ साली माध्यमिक शालांत परीक्षेत कला शाखेतून ते गुणवत्ता यादीत आले होते व मराठी विषयात तर ते विदर्भातून प्रथम होते. त्यांनी १९९० मध्ये नागपूर विद्यापीठातून एम.ए. मराठीची पदवी घेतली. त्यावेळी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानिमित्त त्यांना कै. ना.के. बेहेरे सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले होते. १९८९ पासून ते ‘समुचित’ या त्रैमासिकाचे सहसंपादक होते.
महाराष्ट्रातील दर्जेदार नियतकालिकात त्यांचे ललित, वैचारिक आणि समीक्षापर लेखन प्रकाशित झाले. अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संसद कवितानिल चळवळ यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. १९९१ पासून ते मराठी विषयाचे अध्यापन करीत होते. धम्मराष्ट्राची घटना हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. नामांतर आंदोलन, कळा अभंगाची, आंबेडकरवादी विचारकविता, नामांतर : स्वप्न आणि सत्य ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध नियतकालिकांमधून त्यांची कविता, समीक्षा, लेख प्रकाशित होत. विविध समकालीन साहित्यिक व सांस्कृतिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. हळवे व्यक्तिमत्त्व असलेले नितनवरे हे विद्यार्थ्यांमध्येदेखील लोकप्रिय होते.