महाकुंभात कुटुंबीयांचे ‘बिछडना’ अन काही तासांतच ‘मिलना’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 05:30 IST2025-02-24T05:30:09+5:302025-02-24T05:30:24+5:30
‘खोया-पाया’ केंद्रांची तत्परता : २२ हजारांहून अधिक बेपत्ता भाविकांचा शोध

महाकुंभात कुटुंबीयांचे ‘बिछडना’ अन काही तासांतच ‘मिलना’
- योगेश पांडे
प्रयागराज : हिंदी चित्रपट व विविध कथांच्या माध्यमातून कुंभमेळा म्हणजे कुटुंबातील सदस्यांचे ‘बिछडना’ आणि त्यानंतर वर्षानुवर्षे त्यांचा शोध असे अनेकांच्या मनावर कोरले गेले आहे. मात्र १४४ वर्षांनंतर होणाऱ्या महाकुंभाने हा समज खोडून काढला आहे. ६० कोटींहून अधिक भाविकांच्या गर्दीत जवळपास २२ हजारांहून अधिक भाविक आप्तस्वकीयांपासून दुरावल्या तर गेले. मात्र तंत्रज्ञान व प्रशासनाच्या तत्परतेमुळे त्यातील बहुतांश जणांचा शोध लावण्यातदेखील यश आले. जागोजागी उभारण्यात आलेल्या ‘खोया-पाया’ केंद्रांनाच याचे क्रेडिट देण्यात येत आहे.
महाकुंभासाठी प्रयागराजमध्ये देशविदेशातून भाविक पोहोचत असून अखेरच्या आठवड्यात तर हे प्रमाण अधिक वाढल्याचे दिसून आले. सर्वच ठिकाणी पाय ठेवायलादेखील जागा नसल्याचे चित्र आहे. या गर्दीत एकदा हात सुटला की सोबतचे कधीही दुरावतील अशीच स्थिती आहे. बेपत्ता झालेल्यांचा शोध लागावा यासाठी दरवेळेप्रमाणे यंदादेखील प्रयागराजमध्ये ‘खोया-पाया’ केंद्र स्थापन करण्यात आले आहे. यंदा यात तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीदेखील मदत घेण्यात येत आहे. आतापर्यंत २२ हजारांहून अधिक नागरिक बेपत्ता झाल्याच्या तक्रारी आल्या व त्यातील बहुतांश जणांचा २४ तासांच्या आत शोध घेण्यात प्रशासनाला यश आले.
तंत्रज्ञान आणि पारंपरिक तंत्राची जोड
महाकुंभ क्षेत्रात दहाहून अधिक ‘खोया-पाया’ केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. ही प्रामुख्याने महाकुंभातील विविध सेक्टर तसेच संगम, झुंसी, अरैल घाट, फाफामऊ, प्रयागराज रेल्वेस्थानक, बसस्थानक परिसरात आहेत. ही केंद्र संगणकीकृत आहेत. तेथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आधारित फेस रेकग्निशन सिस्टम, मशीन लर्निंगचादेखील वापर करण्यात येत आहे. सर्व केंद्र एकमेकांशी जोडण्यात आली आहे. त्यामुळे हरविलेल्या व्यक्तीला शोधणे सोपे होत असल्याची माहिती केंद्राचे सल्लागार विनयकुमार दुबे यांनी ‘लोकमत’ला दिली.
विविध भाषांमध्ये होते अनाउन्समेन्ट
‘खोया-पाया’ केंद्रामध्ये देशाच्या विविध भागांतील नागरिक हरविल्याच्या तक्रारी येत आहेत. काहींना हिंदी नीट पद्धतीने समजत नाही. अशा लोकांसाठी मराठी, तेलुगू, गुजराती अशा विविध भाषांमध्येदेखील उद्घोषणा करण्यात येत आहे. हरविलेल्या व्यक्तीने किंवा त्याच्या कुटुंबीयांनी कुठल्या जागेवर यावे याची माहितीदेखील देण्यात येते. तसेच जागोजागी लागलेल्या एलईडी स्क्रीन्सवर फोटोदेखील ‘डिस्प्ले’ करण्यात येतात. तसेच सोशल माध्यमांचादेखील उपयोग करण्यात येत आहे.
कुटुंबीयांना दिला जातोय ‘आधार’
विशेष म्हणजे या ‘खोया-पाया’ केंद्रांवर हरविलेला व्यक्ती किंवा त्याच्या कुटुंबीयांना आधारदेखील दिला जातो. त्यांच्या तात्पुरत्या निवासाचीदेखील सोय करण्यात आली आहे. महिलांसाठीदेखील वेगळी सोय करण्यात आली आहे.
हरविणाऱ्यांमध्ये ‘बीपीएल’ नागरिकांचे प्रमाण जास्त
महाकुंभात येणाऱ्या बहुतांश लोकांकडे स्मार्टफोन्स किंवा साधा मोबाइल फोन तरी आहे. मात्र गरीब लोकांकडे असे चित्र नसते. त्यामुळे बेपत्ता झाल्यावर ते लगेच शोध घेऊ शकत नाहीत. शिवाय शिक्षण नसल्याने अनेकांना ओळखीच्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांकदेखील लक्षात नसतो. अशा लोकांकडे फोटोदेखील नसल्याने ‘फेस रिकग्निशन कॅमेरे’देखील कामात येत नाहीत, अशी माहिती इन्टिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरचे इन्चार्ज व आयपीएस अधिकारी अमित कुमार यांनी ‘लोकमत’ला दिली.