प्रवाशांकडून दंड वसूल करताना नकली टीटीईला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2018 20:07 IST2018-11-01T20:06:13+5:302018-11-01T20:07:13+5:30
डुप्लिकेट पावती बुक तयार करून रेल्वे प्रवाशांकडून दंड वसूल करणाऱ्या नकली टीटीईला रेल्वे सुरक्षा दलाने नरखेड रेल्वेस्थानकावर अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले.

प्रवाशांकडून दंड वसूल करताना नकली टीटीईला अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डुप्लिकेट पावती बुक तयार करून रेल्वे प्रवाशांकडून दंड वसूल करणाऱ्या नकली टीटीईला रेल्वे सुरक्षा दलाने नरखेड रेल्वेस्थानकावर अटक करून लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन केले.
अजय ऊर्फ पप्पु रामलाल भारके (३८) रा. रेल्वेस्टेशन, रेस्ट हाऊसजवळ, काटोल असे नकली टीटीईचे नाव आहे. बुधवारी रेल्वेगाडी क्रमांक १२७२१ हैदराबाद-हजरत निजामुद्दीन दक्षिण एक्स्प्रेसमध्ये नरखेड रेल्वेस्थानकावर गाडी उभी असताना एस १० कोचमध्ये तो प्रवाशांकडून दंड वसूल करताना आढळला. ड्युटीवरील आरपीएफचा जवान विवेक कहार याला त्याच्यावर शंका आली. त्याची चौकशी केली असता तो नकली टीटीई असल्याची बाब स्पष्ट झाली. त्याच्या जवळ दोन बनावट टीटीईचे बुक, रोख ५०० रुपये आणि मोबाईल आढळला. लगेच त्यास ताब्यात घेऊन नागपूर लोहमार्ग पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. लोहमार्ग पोलिसांनी त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.