A fake scientist from ISRO arrested | ईस्त्रोचा बनावट शास्त्रज्ञ गजाआड
ईस्त्रोचा बनावट शास्त्रज्ञ गजाआड

ठळक मुद्देउच्चपदस्थ असल्याची थाप : लग्न जुळविण्याच्या बहाण्याने अनेकींची फसवणूकप्रतापनगर पोलिसांनी बांधल्या मुसक्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लग्न जुळविणाऱ्या संकेतस्थळाचा गैरवापर करून स्वत:ला इस्रोचा शास्त्रज्ञ म्हणवून घेत अनेक तरुणींचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या भामट्याच्या प्रतापनगर पोलिसांनी बुधवारी रात्री मुसक्या बांधल्या. सचिन भीमराव बागडे (वय ३३) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा भंडारा येथील रहिवासी आहे. सध्या तो अजनीतील कुकडे ले-आऊटमध्ये हरिभाऊ वाहने यांच्या घरी भाड्याने राहत होता.
ठगबाज बागडे विवाहित आहे. तो कधी नागपूर तर कधी पुण्यात राहतो, असे सांगतो. स्वत:ला अविवाहित असल्याचे सांगून तो चांगल्या घरच्या मुलींसोबत ऑनलाईन लग्न जुळविण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी जीवनसाथी डॉट कॉम या संकेतस्थळाचा त्याने गैरवापर चालविला होता. आपण बीई, बीटेक, एमई एमटेक असून, केंद्र सरकारच्या डीआरडीओत रिसर्च प्रोफेसर असल्याचे त्याने या संकेतस्थळावर अपलोड केलेल्या आपल्या प्रोफाईलमध्ये नमूद केले होते. त्याची प्रोफाईल बघून त्याच्याशी संपर्कात येणा-या किंवा संकेतस्थळावर असलेल्या सधन परिवारातील तरुणी, महिलांशी संपर्क करून तो त्यांच्यासोबत लग्नाची बोलणी करायचा. प्रतापनगरातील एक तरुणी काही दिवसांपूर्वी त्याच्या संपर्कात आली. बोलता बोलता तिने आपल्याला एसी घ्यायची आहे, असे सांगताच आरोपीने कस्तुरचंद पार्कजवळ मिलीट्री कॅन्टीन आहे, तेथून तुला माफक दरात एसी घेऊन देतो, असे सांगितले. बूकींग अमाउंटच्या नावाखाली ठगबाज बागडेने भीम अ‍ॅपच्या माध्यमातून तिच्याकडून पाच हजार रुपये घेतले. त्यानंतर तो तिला वेगवेगळे कारण सांगून पैसे मागू लागला. वाजवीपेक्षा जास्त अवधी होऊनही एसी मिळत नसल्याचे पाहून तरुणीला संशय आला. तिने चौकशी केली असता त्याने मिलिट्री कॅन्टीनमध्ये बुकींगच केले नाही, असे तिच्या लक्षात आले. तो बनवाबनवी करीत असल्याची खात्री पटल्याने तरुणीने प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी ठगबाज बागडेचा पत्ता शोधून त्याला त्याच्या कुकडे लेआऊटमधील भाड्याच्या घरातून जेरबंद केले.
असे फुटले बींग
आरोपी एवढ्या मोठ्या पदावर असताना छोट्याछोट्या रक्कम मागण्यासाठी तो एवढा आग्रह का धरतो, असा तरुणीला संशय आला. त्यामुळे तिने त्याची चौकशी सुरू केली. त्याने तिला आपण भंडारा येथील रहिवासी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याने दिलेल्या पत्त्यावर तिने संपर्क केला असता तो भामटा असल्याचे तिला कळले. त्याचे बिंग फुटल्याने तरुणीने प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेत वरिष्ठ अधिका-यांनी गोपनियता बाळगत तंत्रशुद्ध पद्धतीचा वापर करून बागडेचे ठिकाण शोधून काढले अन् बुधवारी त्याच्या मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधिकारी वर्तवित आहेत.
आयटी इंजिनिअर ते इस्त्रोचा शास्त्रज्ञ
ठगबाज बागडेने २००८ मध्ये अभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेतला. काही दिवस महाविद्यालयात गेल्यानंतर त्याने शिक्षण सोडले अन् फसवणूकीचा गोरखधंदा सुरू केला. २०१५ मध्ये त्याने जीवनसाथी डॉट कॉमवर आपली प्रोफाईल अपलोड करून पुण्यातील एका आयटी कंपनीतील उच्चपदस्थ तरुणीला आपल्या जाळळ्यात ओढले. आपण ईस्त्रोमध्ये शास्त्रज्ञ असल्याची थाप मारून तिच्यासोबत या भामट्याने लग्न केले. तिची शारिरिक, मानसिक आणि आर्थिक लूट केल्यानंतर तिच्या भावालाही बागडेने फसविले. मुंबईत म्हाडामध्ये लाखोंची सदनिका केवळ काही लाखांत घेऊन देतो, अशी थाप मारून त्याने तरुणीच्या भावाकडून ११ लाख रुपये हडपले. या ठगबाजाची बनवाबनवी उघड झाल्यानंतर तरुणीने वेगळी तर तिच्या भावाने वेगळी तक्रार पोलिसांकडे नोंदवली होती.
दोन महिन्यांपूर्वी मुंबईतील एका तरुणीवर त्याने असेच जाळे फेकले. तो तिच्याशी लग्न करण्याच्या तयारीत होता. मात्र, तरुणींच्या नातेवाईकांनी सतर्कता दाखवून ठगबाज बागडेची चौकशी केली. त्याचे बींग फुटल्यामुळे ती तरुणी उध्वस्त होण्यापासून बचावली.


Web Title: A fake scientist from ISRO arrested
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.