रामलल्लाच्या नावाखाली बनावट प्रसाद योजना : जागरूक व्हा!
By योगेश पांडे | Updated: June 16, 2025 15:06 IST2025-06-16T15:06:25+5:302025-06-16T15:06:59+5:30
Nagpur : 'ऑनलाइन प्रसाद' घोटाळ्याची मालिका! सायबर गुन्हेगारांची नवीन युक्ती

Fake Prasad scheme in the name of Ram Lalla: Be aware!
योगेश पांडे
नागपूर : आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर तीर्थक्षेत्रे असून, त्या पवित्र ठिकाणी पोहोचता येत नसले तरी तेथील प्रसाद ग्रहण करता यावा, अशी भाविकांची अपेक्षा असते. विशेषतः ज्योतिर्लिंग, वैष्णोदेवी, अयोध्या, काशी, मथुरा इत्यादी ठिकाणच्या प्रसादाकडे भाविक डोळे लावून बसलेले असतात. मात्र, भाविकांच्या याच श्रद्धेचा सायबर गुन्हेगारांकडून दुरुपयोग करण्यात येत आहे. तीर्थक्षेत्रांचा प्रसाद ऑनलाइन डिलिव्हर करण्याची बतावणी करत सायबर गुन्हेगारांकडून जाळे रचण्यात येते. प्रसादाच्या नावाखाली अॅडव्हान्स पैसे मागवून प्रसाद डिलिव्हर करण्यात येत नाहीच. याशिवाय काही महाभाग तर पैसे घेतल्यावर प्रसाद म्हणून स्थानिक दुकानांतील मिठाई वगैरे पाठवितात. अव्वाच्या सव्वा पैसे आकारून अशा पद्धतीने श्रद्धेशी खेळ सुरू असून, भाविकांनी यासंदर्भात अलर्ट होण्याची गरज आहे.
आपल्या देशात श्रद्धेला मोल नाही, असे म्हणतात. याच श्रद्धेच्या नावाखाली काही गुन्हेगारांनी फसवणुकीचे जाळे रचले आहे. केवळ प्रसाद किंवा इतर साहित्यच नव्हे, तर अगदी तीर्थक्षेत्रांच्या धर्मशाळांच्या नावावरही फसवणुकीचे प्रकार प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. इंटरनेट तसेच विविध सर्च इंजिन्सवर सायबर गुन्हेगार प्रसाद किंवा इतर ऑनलाइन सुविधा देत असल्याचे सांगत त्यावर स्वतःचा मोबाइल क्रमांक अपलोड करतात. त्या मोबाइल क्रमांकावर भाविकांनी संपर्क केल्यावर त्यांच्याकडून अॅडव्हान्स पैसे घेण्यात येतात. मात्र, प्रत्यक्षात भाविकांना प्रसाद किंवा इतर साहित्य कधीच मिळत नाही.
धर्मशाळा - भक्तनिवासांच्या नावाखालीही 'फ्रॉड'
इतकेच काय तर भक्तनिवास व धर्मशाळांमध्ये भाविक पोहोचल्यावर त्यांचे बुकिंग झालेच नसल्याची बाब समोर येते. नागपुरातील अनेकांसोबत अशा पद्धतीचे फ्रॉड झाले आहेत. जैन समाजातील एक कुटुंब आग्रा येथे गेले होते. त्यांनी ऑनलाइन माध्यमातूनच तेथील मुख्य बाजारातील धर्मशाळेचे इंटरनेटवरून क्रमांक शोधून बुकिंग केले. समोरील व्यक्तीने बुकिंगसाठी पैसेदेखील घेतले. मात्र, कदंब तेथे पोहोचले असता प्रत्यक्षात संबंधित क्रमांक धर्मशाळेचा नव्हताच, अशी बाब समोर आली. असे प्रकार मागील काही काळापासून वाढीस लागले आहेत.
अयोध्येचा महाप्रसाद घोटाळ्याची पोलखोल, इतर ठिकाणांचे काय ?
प्रसादाच्या नावाखाली घोटाळ्याचा एक प्रकार अयोध्येत समोर आला. अयोध्येतील रामलल्लाच्या प्रसादाच्या नावाखाली ३.८५ कोटी रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली. आशिष सिंग नावाच्या आरोपीने यासाठी बनावट संकेतस्थळ सुरू केले होते. त्याने स्वतःला सिएटलमधील नॉर्थ इस्टर्न विद्यापीठात प्राध्यापक असल्याचे भासवले आणि लाखो भाविकांना राम मंदिराचा प्रसाद घरपोच मिळेल, अशी बतावणी केली होती. त्याने देश-विदेशातील भाविकांकडून ऑर्डर्स घेतल्या आणि स्थानिक मिठाई प्रसाद म्हणून डिलिव्हर करणे सुरू केले. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर घोटाळा समोर आला. असेच प्रकार देशातील इतरही अनेक तीर्थक्षेत्रांबाबत सुरू आहेत.