बनावट 'एनसीईआरटी'च्या पुस्तकांची देशभरात विक्री

By योगेश पांडे | Updated: August 11, 2025 19:10 IST2025-08-11T19:09:24+5:302025-08-11T19:10:59+5:30

हरयाणा, दिल्ली, यूपीत प्रिंटिंग : बनावट वॉटरमार्कच्या पानांचे 'मिल्स'मध्ये उत्पादन

Fake NCERT books being sold across the country | बनावट 'एनसीईआरटी'च्या पुस्तकांची देशभरात विक्री

Fake NCERT books being sold across the country

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
नागपुरात 'एनसीईआरटी'च्या बनावट पुस्तकांच्या विक्रीचे 'रॅकेट' समोर आल्यानंतर शालेय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अनेक शाळांतील विद्यार्थी व पालकांकडून त्यांच्याकडे असलेल्या पुस्तकांचा दर्जा खरोखरच खराब असल्याचे सांगण्यात येत आहे. बनावट पुस्तकांच्या विक्रीचे रॅकेट केवळ नागपुरात नसून देशभरात याची व्याप्ती पसरली आहे.


विशेषतः हरयाणा, दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये यांचे मुद्रण होते व तेथून यांचा देशभरात ठरावीक 'लिंक'च्या माध्यमातून पुरवठा होतो. केवळ दीड वर्षातच देशात एकट्या 'एनसीईआरटी'च्या ४.७१ लाख बनावट पुस्तकांचा साठा जप्त झाला आहे. त्याहून अधिक माल प्रत्यक्ष विद्यार्थ्यांच्या दप्तरात पोहोचला आहे. 'लोकमत'ने नागपुरात 'एनसीईआरटी'च्या बनावट पुस्तकांच्या विक्रीच्या रॅकेटचा भंडाफोड केला. बऱ्याच पालक व विद्यार्थ्यांनी पुस्तकांच्या दर्जाबाबत असमाधान व्यक्त केले. त्यानंतर तेथीलच एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर 'लोकमत'ला पुस्तक विक्रीच्या रॅकेटबाबत आणखी माहिती दिली.


सर्वसाधारणतः दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश येथे 'एनसीईआरटी'च्या पुस्तकांचे बनावटीकरण करण्यात येते. काही प्रिंटिंग प्रेस मालक व शिक्षण क्षेत्रातील दलाल यात कार्यरत आहेत. कुणालाही शंका येऊ नये यासाठी 'एनसीईआरटी'चा बनावट वॉटरमार्क असलेले पेपरदेखील काही लहान 'मिल्स'ला हाताशी धरून तयार केले जातात. त्या पेपरचा दर्जा फारच सुमार असतो व अनेकदा त्यावर छपाई झाल्यावर अक्षरे अस्पष्ट दिसतात. ठरावीक 'लॉजिस्टिक चॅनेल्स'च्या माध्यमातून ही पुस्तके देशभरात पोहोचविली जातात. पायरसी करणाऱ्यांसाठी एजंट्स काम करतात व ते पुस्तक विक्रेते तसेच काही शाळांशी समन्वय साधतात. मागील आठवड्यात नागपुरातील महालातील टिळक मार्गावरील कर्मवीर बुक डेपोत बनावट पुस्तके आढळली होती व तेथून ३६ विषयांची बनावट पुस्तके जप्त करण्यात आली होती.


वितरकांचीदेखील मोठी 'चेन'
बनावट पुस्तके 'लॉजिस्टिक चॅनेल'ने देशभरात पोहोचविण्याचे नियोजन तर होते. मात्र पुस्तक विक्रेत्यांपर्यंत शाळेचा सिझन सुरू होण्याच्या अगोदर पोहोचविण्यासाठी वितरकदेखील नेमण्यात येतात. या वितरकांची मोठी चेन' असते. एनसीईआरटीकडून ना नफा ना नोटा या तत्त्वावर पुस्तके तयार केली जातात. मात्र 'पायरसी' करणाऱ्यांकडून जास्त नफ्याची मार्जिन असल्याने वितरक सहजपणे दुकानमालकांना जाळ्यात ओढतात.


दीड वर्षात ४.७१ लाख पुस्तके जप्त
'एनसीईआरटी'कडे यासंदर्भात सातत्याने तक्रारी येत आहेत. या बनावट पुस्तकांमुळे 'एनसीईआरटी'ला मोठे आर्थिक नुकसानदेखील झाले होते. त्यामुळे विशेष पथक तयार करून 'एनसीईआरटी'ने या 'पायरसी' विरोधात पावले उचलली. विविध राज्यांच्या पोलिस यंत्रणेसोबत 'एनसीईआरटी'ची ४.७१ लाख बनावट पुस्तके जप्त करण्यात आली आहेत. मागील दीड वर्षातील ही आकडेवारी आहे. 'एनसीईआरटी'च्या पुस्तकांचे बनावटीकरण करणाऱ्या ३० जागांवर धाडी टाकण्यात आल्या व २० कोटींहून अधिक साठा तसेच 'पायरसी'साठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री जप्त करण्यात आली आहे.

Web Title: Fake NCERT books being sold across the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर