२६.०९ कोटीचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 19:43 IST2020-11-18T19:41:53+5:302020-11-18T19:43:12+5:30
credit scam Nagpur News आंतरराज्य खोट्या बिलाद्वारे १३१ कोटीपेक्षा जास्त रुपयांचा बनावट व्यवहार करणाऱ्या तीन करदात्यांवर वस्तू व सेवा कर (जीएसटी) गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर विभागाने मंगळवारी कारवाई केली.

२६.०९ कोटीचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घोटाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आंतरराज्य खोट्या बिलाद्वारे १३१ कोटीपेक्षा जास्त रुपयांचा बनावट व्यवहार करणाऱ्या तीन करदात्यांवर वस्तू व सेवा कर (जीएसटी) गुप्तचर संचालनालयाच्या (डीजीजीआय) नागपूर विभागाने मंगळवारी कारवाई केली. या कारवाईत या करदात्यांनी घोटाळा करून खोट्या बिलाद्वारे २६.०९ कोटीचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट घेतल्याचे उघडकीस आले आहे. तीन करदात्यांमध्ये एक महाराष्ट्राचा असून, दोघे कर्नाटकचे रहिवासी आहेत.
ऑनलाईन साधनांचा वापर करून विकसित केलेल्या टुल्सच्या आधारे बनावट पावत्या देण्यामध्ये आणि फसवे आयकर विवरण मिळविण्याच्या प्रकरणात करदात्यांचा चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गम भागात शोध घेण्यात आला. करदाते बनावट आणि अस्तित्वात नसल्याचे कारवाईत उघड झाले. जीएसटी पोर्टलवर कर भरणाऱ्यांनी पत्त्यांचा पुरावा म्हणून अपलोड केलेली कागदपत्रे जसे वीज बिल इत्यादी सर्व बनावट होते. कर्नाटकमधील आणखी दोन करदात्यांचा तपशीलदेखील तपासात उघडकीस आला आहे. ते या रॅकेटचा भाग असून त्यांनी त्याच तारखेला जीएसटी नोंदणी घेतल्याचे कारवाईत आढळून आले. त्यांनी आरईजी०१ मध्ये समान ई-मेल पत्ते जाहीर केले होते आणि ते एकमेकांना पुरवठा आणि खरेदी करणारे एकच होते. कर्नाटकातील रहिवासी असलेल्या किंगपिनला अटक करण्यासाठी डीजीजीआय विभागीय युनिटने न्यायालयात धाव घेतली आहे.