नागपुरात फेसबुकवरचा वाद रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 19:44 IST2020-06-06T19:43:03+5:302020-06-06T19:44:59+5:30
फेसबुकवर एकमेकांसोबत संवाद करताना त्याचे वादात रूपांतर झाले. एकाने दुसऱ्याला आईची शिवी दिली. त्यामुळे फेसबुकवरचा वाद रस्त्यावर आला आणि दोघांनी एकावर हल्ला करून त्याला जबर जखमी केले.

नागपुरात फेसबुकवरचा वाद रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : फेसबुकवर एकमेकांसोबत संवाद करताना त्याचे वादात रूपांतर झाले. एकाने दुसऱ्याला आईची शिवी दिली. त्यामुळे फेसबुकवरचा वाद रस्त्यावर आला आणि दोघांनी एकावर हल्ला करून त्याला जबर जखमी केले. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. शब्बीर खान आणि आदित्य गेडाम अशी आरोपींची नावे असून, हे दोघेही खरबीच्या साईबाबानगरात राहतात. मनीष हेमराज घरटे हा सुद्धा त्याच वस्तीत राहतो. शब्बीर, आदित्य आणि मनीष हे तिघे एकमेकांचे फेसबुक फ्रेंड होते. मनीष आणि आरोपी शब्बीर तसेच आदित्य फेसबुकवर चॅटिंग करायचे. नाजूक कारणावरून त्यांच्यात वादाला तोंड फुटले.
ते एकेरीवर उतरले. मनीषने आरोपी शब्बीर तसेच आदित्यला आईच्या शिव्या दिल्या. त्यामुळे संतापलेल्या शब्बीर आणि आदित्यने मनीषला शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास त्याचा घराजवळ गाठले. तू फेसबुकवर आईच्या शिव्या का दिल्या, अशी विचारणा करून त्यांनी मनीषला हातबुक्कीने मारहाण केली, नंतर लाकडी टोकदार दांड्याने त्याच्या डोक्यावर, डाव्या हातावर जबर मारहाण केली. यामुळे मनीष गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीवरून वाठोडा पोलिसांनी आरोपी शब्बीर खान आणि आदित्य गेडाम या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील चौकशी सुरू आहे.