राज्य विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांना मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 00:38 IST2018-06-23T00:36:31+5:302018-06-23T00:38:22+5:30
राज्य विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुदतवाढीचे आदेश जारी केले.

राज्य विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ.अनंत कळसे यांना मुदतवाढ
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर - राज्य विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ. अनंत कळसे यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुदतवाढीचे आदेश जारी केले. तब्बल ३६ वर्षांपासून विधिमंडळ सचिवालयात कार्यरत अनंत कळसे यांचा कार्यकाळ ३० जूनला संपणार होता. त्यांच्या निवृत्तीनंतर नवीन नियुक्तीबाबत सरकार दरबारी पेच निर्माण झाला. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या ४ जुलैपासून नागपुरात सुरू होत आहे. यात प्रधान सचिवांची जबाबदारी महत्त्वाची असल्याने अधिवेशन तोंडावर ही जबाबदारी कोण सांभाळेल, असा प्रश्न सरकारला पडला. याशिवाय सचिव व दोन उपसचिवांची पदे रिक्त आहेत. तसेच चार उपसचिव न्यायालयात गेले असल्याने या जागादेखील रिक्त असल्याप्रमाणे स्थिती आहे या पार्श्वभूमीवर कळसे यांना मुदतवाढ देण्यात आल्याचे सांगितले जाते.