मौदा तालुक्यातील कंपनीत स्फोट, एका कामगाराचा मृत्यू, सहा गंभीर जखमी
By जितेंद्र ढवळे | Updated: August 6, 2024 13:24 IST2024-08-06T13:23:21+5:302024-08-06T13:24:26+5:30
Nagpur : स्फोट नेमका कशाचा व का झाला अद्याप अस्पष्ट

Explosion in a company in Mauda taluka, one worker killed, six seriously injured
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : झुल्लर (ता. मौदा, जिल्हा नागपूर) शिवारातील श्री. जी. ब्लॉक या सिमेंट विटा तयार करणाऱ्या कंपनीत मंगळवारी (दि. ६) सकाळी स्फोट झाला. यात एका कामगाराचा होरपळून मृत्यू झाला तर सहा कामगार गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना नागपूर शहरातील हॉस्पिटलमध्ये भरती केले आहे.
नंदकिशोर करंडे (४०) असे मृत कामगाराचे नाव आहे. नंदकिशोर हा कंपनीत आठ वर्षांपासून क्रेन ऑपरेटर म्हणून कार्यरत होता. मंगळवारी सकाळी कंपनीत विटा तयार करण्याचे काम सुरू होते. अचानक स्फोट झाला आणि कामगार घाबरले. या स्फोटात नंदकिशोरचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर अन्य सहा कामगार गंभीर जखमी झाले. त्यांची नावे कळू शकली नाही. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले व जखमी कामगारांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेले. प्रथमोपचारानंतर त्यांना नागपूर शहरातील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. हा स्फोट नेमका कशाचा व का झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीनच्या कॉम्प्रेसरचा हा स्फोट असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.