उमरेड येथील ॲल्युमिनियम फॉइल कंपनीत स्फोट, ७ कामगार होरपळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 21:48 IST2025-04-11T21:47:35+5:302025-04-11T21:48:12+5:30
जखमींना मेडिकलमध्ये केले रवाना, अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी

उमरेड येथील ॲल्युमिनियम फॉइल कंपनीत स्फोट, ७ कामगार होरपळले
लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर(उमरेड): उमरेडमधील एमआयडीसीत असलेल्या एमएमपी इंडस्ट्रीज लि. कंपनीत शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. यात ७ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिस यंत्रणा, अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या कामगारांना उपचारासाठी उमरेडच्या खासगी रुग्णालयात व नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले.
कमलेश ठाकरे (२०, रा.गोंडबोरी), सचिन मेश्राम (२०, रा. पांजरेपार) अशी या स्फोटात गंभीर जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. त्यांना नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याशिवाय करण बावने, पीयूष टोकास, ध्वनीत कुंबरे आणि पीयूष दुर्गे या चार कामगारांवर उमरेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
उमरेड एमआयडीसीत एमएमटी ही ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडर तयार करणारी कंपनी आहे. ॲल्युमिनियम फॉइल आणि पावडरचा वापर पॅकेजिंगसाठी करण्यात येतो. शुक्रवारी सायंकाळी ५:३० वाजताच्या सुमारास या कंपनीत जोराचा स्फोट झाला.
कच्च्या ॲल्युमिनियम पावडरचा उपयोग करून ॲल्युमिनियम फाॅइलला पॉलिश करण्याचे काम ज्या मशिनमध्ये केले जाते, ती मशिन हाताळत असताना, कंपनीत अचानक स्फोट झाला. ॲल्युमिनियम पावडर असल्याने आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही.
घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलिस अधिकारी वृष्टी जैन, उमरेडचे ठाणेदार धनाजी जळक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी अग्निशमन दलासह रुग्णवाहिकांना पाचारण करून स्फोटातील जखमी कामगारांना बाहेर काढत त्यांना उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये रवाना केले. दरम्यान महापालिकेच्या लकडगंज आणि सक्करदरा झोनमधील दोन अग्निशमन वाहने आणि सात जवान घटनास्थळी रवाना करण्यात आले. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांसह विविध यंत्रणांचे बचाव कार्य सुरू होते.
१५० कामगार बचावले
या कंपनीत एकूण ४५० कामगार आहेत. सायंकाळच्या शिफ्टमध्ये अंदाजे १५० कामगार कामावर होते. स्फोट झाल्यानंतर आगीचा भडका उडाला. दरम्यान कामगार आपला जीव मुठीत घेऊन बाहेर धावत सुटले. यामुळे अनेक कामगार थोडक्यात बचावले.