निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचा विस्तार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2024 19:08 IST2024-02-24T19:08:16+5:302024-02-24T19:08:25+5:30
२५ उपाध्यक्ष, ३५ महासचिवांची शहर कार्यकारिणी जाहीर.

निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचा विस्तार
कमलेश वानखेडे, नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्ष संघटनेचा विस्तार केला आहे. २५ उपाध्यक्ष, ३५ महासचिव, ४२ सचिव व ११ सहसचिव असलेली जम्बो शहर कार्यकारिणी शहर अध्यक्ष प्रशांत पवार यांनी शनिवारी जाहीर केली. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची वेळ मिळाली तर २८ फेब्रुवारी रोजी नागपुरात एक सोहळा आयोजित केला जाईल व त्यात इतर पक्षातील महत्वाचे नेते राष्ट्रवादीत प्रवेश घेतील, असा दावाही पवार यांनी केला.
कार्यकारणीची घोषणा केल्यानंतर प्रशांत पवार म्हणाले, नव्या कार्यकारिणीत श्रीकांत शिवणकर यांना कार्याध्यक्षम्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. शहरातील सहाही विधानसभा निहाय विभागीय अध्यक्ष नियुक्त करून त्यांना त्यांची कमिटी नेमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचा झपाट्याने विस्तार होत आहे. राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांसह विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवर व्यक्तिही पक्षाशी जुळत आहेत. येत्या काळात शहरात पक्षाचा जनाधार वाढलेला दिसेल. पक्षाच्या प्रदेश महासचिव व महिला आयोगाच्या सदस्य आभा पांडे या आठवड्यातून एक दिवस पक्ष कार्यालयात उपस्थित राहून महिलांच्या समस्या ऐकूण घेत त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला श्रीकांत शिवणकर, आभा पांडे, ईश्वर बालबुधे, लक्ष्मी सावरकर, राजेश माटे, नागेश देडमुठे, आनंद सिंह, राहुल कामडे आदी उपस्थित होते.