दिवसाढवळ्या गोळ्या झाडून माजी पत्रकाराची हत्या
By दयानंद पाईकराव | Updated: February 24, 2024 17:06 IST2024-02-24T17:06:38+5:302024-02-24T17:06:56+5:30
उपराजधानीत खुनांची मालिका थांबत नसल्याचे चित्र असून मागील २४ दिवसातील हा १३ वा खून आहे.

दिवसाढवळ्या गोळ्या झाडून माजी पत्रकाराची हत्या
नागपूर : दिवसाढवळ्या घरात घुसून एका माजी पत्रकाराचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना सदर पोलिस ठाण्यांतर्गत राजनगरात घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान उपराजधानीत खुनांची मालिका थांबत नसल्याचे चित्र असून मागील २४ दिवसातील हा १३ वा खून आहे.
विनय उर्फ बबलु पुणेकर (रा. राजनगर) असे खून झालेल्या माजी पत्रकाराचे नाव आहे. ते काही वर्षापूर्वी एका वृत्तपत्रात छायाचित्रकार म्हणून कार्यरत होते. सध्या ते दिनशॉ कंपनीत मार्केटींगमध्ये कार्यरत होते. पैशांच्या व्यवहारातून त्यांचा अनेकांसोबत वाद होत होता. या वादातून त्यांचा खून झाला असावा, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास पुणेकर हे राजनगर येथील आपल्या घरी झोपले होते. एक युवक त्यांच्या घराचे गेट उघडून आत घुसला. त्याने पुणेकर यांच्यावर गोळ्या झाडून त्यांना खून केला.
खुनानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर काही वेळातच पुणेकर यांचा खून झाल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. सदर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या प्रकरणी सदर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरु केला आहे. दरम्यान सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक युवक पुणेकर यांच्या घरात शिरून थोड्याच वेळात लगबगीने बाहेर निघतानाचे दृष्य कैद झाले असून त्यानुसार पोलिस फुटेजमधील युवकाचा शोध घेत आहेत.