EVM deletion, save the country: Bell alarmed agitation of Wanchi Bhujan Aghadi | ईव्हीएम हटाव, देश बचाव : वंचित बहुजन आघाडीचा घंटानाद
ईव्हीएम हटाव, देश बचाव : वंचित बहुजन आघाडीचा घंटानाद

ठळक मुद्देबॅलेट पेपरनेच निवडणुका घेण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ईव्हीएम मशीन या पारदर्शी नाहीत. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये अनेक ठिकाणी प्रत्यक्ष झालेले मतदान आणि मोजण्यात आलेली मते, यात बरीच तफावत आढळून आली आहे. त्यामुळे ईव्हीएम मशीन या देशाच्या लोकशाहीसाठी घातक असून, त्या निवडणूक प्रक्रियेतून तात्काळ हटवण्यात याव्यात आणि बॅलेट पेपरनेच मतदान घ्यावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघातर्फे करण्यात आली आहे. ईव्हीएम हटाव, देश बचाव असा नारा देत सोमवारी राज्यभरात घंटानाद करण्यात आला. नागपुरात संविधान चौक येथे शहर अध्यक्ष रवी शेंडे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.
यावेळी रवी शेंडे यांनी सांगितले की, ईव्हीएमबाबत आधीपासूनच संशय आहे. लोकसभा निवडणुकीतही महाराष्ट्रात ईव्हीएममध्ये गडबड दिसून आली. झालेल्या मतदानाच्या तुलनेत मोजण्यात आलेल्या मतांची संख्या अधिक आढळून आली. याबाबत निवडणूक आयोगाने मौन धारण केले आहे. आयोगाच्या धोरणामुळे लोकांच्या मतांची चोरी होत आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे, तेव्हा त्यांनी यावर तातडीने कारवाई करावी. याबाबत आमचे नेते अ‍ॅड. प्रकाश ऊर्फ बाळासाहेब आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांना काही प्रश्न विचारले आहे. येत्या १५ दिवसात निवडणूक आयोगाने या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न दिल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सोमवारी संपूर्ण राज्यात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयांवर आंदोलन करण्यात आल्याचेही शेंडे यांनी सांगितले.
यावेळी कार्यकर्त्यांनी ईव्हीएमच्या विरोधात घोषणा देत ती हटविण्याची मागणी लावून धरली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्यामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाला निवेदन सादर करण्यात आले.
या आंदोलनात पक्षाचे ज्येष्ठ नेते राजू लोखंडे, प्रदेश महासचिव सागर डबरासे, मिलिंद मेश्राम, अरुण फुलझेले, भाऊराव सोनपिंपळे, अनिता मेश्राम, नालंदा गणवीर, कांचन देवगडे, समिता नंदेश्वर, गोवर्धन बेळे, हरीश नारनवरे, संजय सूर्यवंशी, रमेश कांबळे, अंकुश मोहिले, देवेंद्र मेश्राम, गौतम पाटील, प्रिन्स गवई आदी उपस्थित होते.


Web Title: EVM deletion, save the country: Bell alarmed agitation of Wanchi Bhujan Aghadi
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.