कधी ऐकलात का ‘फॉरेन बॉडी’बद्दल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2018 10:50 AM2018-10-27T10:50:19+5:302018-10-27T10:50:46+5:30

कान-नाक-घशात घातलेल्या किंवा अडकलेल्या वस्तूंना आमच्या वैद्यकीय भाषेत ‘फॉरेन बॉडी म्हणतात.

Ever wondered about 'foreign body'? | कधी ऐकलात का ‘फॉरेन बॉडी’बद्दल?

कधी ऐकलात का ‘फॉरेन बॉडी’बद्दल?

Next
ठळक मुद्देनाक-कान-घशातील या विशिष्ट रचनेविषयी सांगताहेत कान-नाक व घसा तज्ज्ञ डॉ. संजय कुलकर्णी....

-डॉ. संजय कुलकर्णी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: खेळता-खेळता अनवधानाने तर कधी गंमत किंवा उत्सुकता म्हणून लहान मुलांच्या कानात, नाकात किंवा घशात काहीतरी जाते. पालक म्हणून आपणास २४ तास मुलांकडे खरंच लक्ष देणे शक्य असते का आणि लहान मुलांना समज कमी असल्याने त्यांना आपण नेमके काय करत आहोत याचे गांभीर्य नसते. कान-नाक-घशाची रचना, त्यांची कार्यपद्धती समजून घेऊन त्यानुसार काळजी घेणे हे यातील धोके टाळण्यासाठी जरूरी असते. पेन्सिल, खडू, खोडरबर, मनी, कडधान्य, बिया, पेनाचे टोपण, घड्याळातील सेल, स्पंजचा तुकडा किंवा काहीही मुले नाकात, कानात घालून दवाखान्यात येतात. काही नाणे, सेफ्टीपीन, टणक खाद्यपदार्थांचे तुकडे, बोल्ट इत्यादी अपघाताने गिळून अन्ननलिका किंवा श्वसनलिकेत अडकलेले घेऊन दवाखान्यात येतात. नेमके काय, कशात आणि कुठे अडकले आहे यानुसार त्याची तीव्रता असते. हे प्रकार जीवघेणेदेखील ठरू शकतात. अशा कान-नाक-घशात घातलेल्या किंवा अडकलेल्या वस्तूंना आमच्या वैद्यकीय भाषेत ‘फॉरेन बॉडी म्हणतात.
या अनुषंगाने कान-नाक-घशाची रचना समजून घेणे गरजेचे आहे. आपल्याला बाहेर दिसणाऱ्या कानापासून आत कानाच्या पडद्यापर्यंत २.५ से. मी. लांबीची एक हाडाची नळी (एक्स्टर्नल आॅडिटरी कॅनल) असते आणि ती इंग्रजी ‘एस’ आकाराची असते. इथली त्वचा थेट हाडावरच असते आणि शरीरात इतर ठिकाणी असणारे त्वचेखालील विविध स्तर या भागात नसतात. म्हणूनच या भागात आजारात होणाऱ्या वेदना असह्य असतात. कानाचा पडदा या नळीच्या शेवटी काही अंशात तिरपा असतो आणि इथून पुढे मधल्या कानाचा भाग सुरू होतो. बाहेरून निमुळत्या पोकळीसारख्या वाटणाऱ्या नाकात बऱ्यापैकी जागा असते आणि मागच्या बाजूला उतार असतो. नाक आणि घसा मागून एकमेकांना जोडलेले असतात. तोंड उघडून आत पाहिल्यावर दिसणाऱ्या भागांव्यतिरिक्त घशात खालच्या बाजूला श्वासननलिका (समोर) व अन्ननलिकांची (मागे) सुरुवात असते. श्वसननलिकेच्या सुरुवातीला स्वरयंत्र असते आणि श्वसननलिकेच्या तोंडावर एक झापड (इपिग्लोटीस) असते. नाकातून घेतलेला श्वास नाकातून मागे जाऊन घशात समोरच्या बाजूस असलेल्या श्वसननलिकेत येतो तर आपण खाल्लेला घास मागच्या बाजूस असलेल्या अन्ननलिकेत जातो. घशात या दोन्हीही प्रवाहांचे (एअर अ‍ॅण्ड फूड पॅसेज) क्रॉसिंग असते. आपण गिळताना त्या क्षणाकरिता श्वसननलिकेची झापड बंद असते तर बोलताना, रडताना, श्वास घेताना ती उघडी असते.
कान-नाक-घसा एकमेकांशी जोडलेले असल्यामुळे आणि त्यांच्या क्लिष्ट रचनेमुळे कोणताही घरगुती उपाय न करतात तातडीने दवाखान्यात नेणे हिताचे असते. घरच्या घरी चिमट्याने काढण्याचा प्रयत्न करणे, शिंका याव्यात म्हणून तपकीर ओढायला देणे, कानात मनाने औषध किंवा घरगुती काही घालणे किंवा पाठीवर थोपटणे वगैरे प्रकार करण्यामुळे अधिकचा धोका संभवू शकतो. कान, नाक, घशातील नाजूक भागांना धोका होण्याव्यतिरिक्त रक्तस्राव होण्याचा आणि या फॉरेन बॉडी श्वसननलिकेत वा अन्ननलिकेत जाण्याची दाट शक्यता असते. बाह्यरुग्ण विभागात सहजासहजी निघणाऱ्या या फॉरेन बॉडी काढण्याकरिता मग विनाकारण काथ्याकूट करावी लागते आणि श्वसननलिकेत गेल्यास जीवाला धोका होऊ शकतो तो वेगळाच. कानात किडा वगैरे गेल्यास घरगुती उपाय म्हणून एखादवेळेस घरी असलेले कोणतेही कानाचे ड्रॉप्स घातलेले चालतात पण इतर वेळेस म्हणजे तेव्हा फुगण्यासारख्या फॉरेन बॉडी (बिया, कडधान्य इ.) असतात तेव्हा असे करण्याने ते काढायला आणखीन अवघड होऊन बसते. शक्यतो स्वत: काहीही न करता डॉक्टरांकडे जाणे हेच जास्त फायद्याचे आणि लवकरात लवकर त्रास कमी करणारे असते. श्वसननलिका किंवा अन्ननलिकेत अडकलेल्या फॉरेन बॉडी आॅपरेशन थिएटरमध्ये भूल देऊन दुर्बिणद्वारे काढाव्या लागतात. बऱ्याचदा लहान मुलांनी असे नाकात घातलेले दुर्लक्षित राहते आणि काही दिवसानंतर दुर्गंधी येणे किंवा रक्त येणे सुरू होते. नाकातल्या त्या फॉरेनबॉडी एव्हाना कुजलेल्या असल्यामुळे अशा प्रकारच्या रुग्णातदेखील भूल देऊन काढण्याची गरज पडते. त्यामुळे लहान मुलांत ती समज निर्माण करणे, जमेल तेवढे लक्ष देणे, अशावेळी घरगुती उपायांना टाळणे आणि वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.
 

 

Web Title: Ever wondered about 'foreign body'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य