मतदानासाठी पात्र झाले, तरीही 'या' तरुणांना निवडणुकीत बजावता येणार नाही मतदानाचा हक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 18:53 IST2025-10-18T18:52:28+5:302025-10-18T18:53:50+5:30
Nagpur : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार मतदार यादीचा कार्यक्रमही जाहीर करून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे

Even though they are eligible to vote, 'these' youths will not be able to exercise their right to vote in the elections.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली आहे. त्यानुसार मतदार यादीचा कार्यक्रमही जाहीर करून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे; मात्र जुलैनंतर वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या तरुणांना आगामी निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे.
गट, गणाची प्रभाग रचना, अध्यक्ष, नगराध्यक्ष, सभापतिपदाचे आरक्षण आदी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता सदस्य पदाचेही आरक्षण काढले जाणार आहे. शिवाय मतदार यादीचा कार्यक्रमही प्रशासनाकडून राबविला जात आहे. निवडणुकीत मतदार हा महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते; मात्र आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने १ जुलै २०२५ पर्यंतचीच मतदार यादी ग्राह्य धरण्यात आली. तसेच नवीन मतदारांची नोंदणीही करण्यात आली नाही. अशावेळी मोठ्या प्रमाणात नवमतदारांना पात्र असूनही, केवळ नोंदणीअभावी मतदानाच्या अधिकारापासून मुकावे लागणार आहे.
स्थानिक निवडणुकांसाठी ही मतदार यादी ग्राह्य
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याच्या दृष्टीने शासन आणि प्रशासन स्तरावर तयारी सुरू आहे. त्या अनुषंगाने १ जुलै २०२५ पर्यंतची मतदार यादीदेखील ग्राह्य धरण्यात आली. यात मात्र जुलैनंतर मतदानासाठी पात्र ठरलेल्या नवमतदारांचा निवडणूक विभागाला विसर पडला आहे.
जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीनंतर वाढले ७९,९८२ मतदार
विधानसभा निवडणुकीनंतर नागपूर जिल्ह्यातील मतदारसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. नव्याने ७९,९८२ मतदारांची भर पडल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांपूर्वीच जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१८ वर्षे पूर्ण झालेले तरुण वंचित राहणार
पहिल्या मतदानावरून तरुणाईमध्ये मोठा उत्साह असतो. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर होत आहे. अशा स्थितीत १८ वर्षे पूर्ण झालेल्या तरुण मतदारांचा १ जुलै २०२५ ची मतदार यादी ग्राह्य धरल्याने भ्रमनिरास झाला आहे. त्यांना मतदान प्रक्रियेपासून मुकावे लागणार आहे.
नवमतदार आहे अर्ज क्रमांक ६ नोंदणीसाठी
नवीन मतदारांची नोंदणी करण्यासाठी फॉर्म ६ वापरला जातो. हा फॉर्म ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने भरता येऊ शकतो. मतदार यादीत प्रथमच नाव नोंदवण्यासाठी किंवा एका मतदारसंघातून दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतरित झाल्यावरही हा फॉर्म वापरला जातो.