नागपुरात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 00:14 IST2020-11-26T00:13:09+5:302020-11-26T00:14:49+5:30
Engineering student strangled मानकापूर येथील बाबा फरीदनगर येथे राहणाऱ्या अभियांत्रिकी शाखेच्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी घडली.

नागपुरात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने घेतला गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानकापूर येथील बाबा फरीदनगर येथे राहणाऱ्या अभियांत्रिकी शाखेच्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी घडली. आयुष अजयकुमार यादव (१९) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.. आयुषचे वडील रेल्वेत अधिकारी आहेत. तर आई प्राध्यापिका आहे..
मिळालेल्या माहितीनुसार आयुष रामदेवबाबा इंजिनियरिंग महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी होता. वडील ड्युटीवर गेल्यानंतर आई सुद्धा दुपारी १२.३० वाजता खरेदीसाठी बाजारात गेली होती. यानंतर आयुषने गळफास घेतला. दुपारी ३.३० वाजता आई घरी परत आली. खूप वेळपर्यंत दरवाजाची बेल वाजवल्यानंतरही आयुषने कुठलाही प्रतिसाद दिला नाही. अखेर आईने शेजाऱ्यांना बोलावून घेतले. शेजारी व त्यांच्याकडे काम करणाऱ्या पेंटरच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा आयुष फासावर लटकलेला होता. त्याला रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मानकापूरचे पीएसआय नाईक, हवालदार प्रमोद दिघोरे आणि राजकुमार श्रीखंडे घटनास्थळी पोहोचले. असे सांगितले जाते की, आयुषला आयआयटीमध्ये जायचे होते. जेई मेन्समध्ये अपेक्षित गुण न मिळाल्याने त्याला प्रवेश मिळू शकला नाही. त्यामुळे तो नैराश्यात होता. त्याच्या आत्महत्येमुळे आईवडील व परिसरातील लोकांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. मानकापूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.