अभियांत्रिकीचे ‘ऑप्शन फार्म’ आजपासून, तर एमबीएचे उद्यापासून
By आनंद डेकाटे | Updated: August 8, 2024 16:41 IST2024-08-08T16:40:50+5:302024-08-08T16:41:42+5:30
Nagpur : पुढील महिन्यापर्यंत सुरू राहतील प्रवेश

Engineering 'Option Farm' starts from today, MBA from tomorrow
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशाच्या दोन फेऱ्या ऑगस्टमध्ये होत होत्या, मात्र यावेळी ही प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. सीईटी सेलने पहिल्या वर्षासाठी कॅप राउंडसाठी ऑप्शन फॉर्म भरण्याची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार ९ ते ११ ऑगस्टपर्यंत ऑप्शन फॉर्म भरता येणार आहेत. तसेच एमबीएच्या प्रवेशासाठी कॅप राउंडचे ऑप्शन फॉर्म १० ऑगस्टपासून सुरू होतील.
जागांचे पहिले वाटप १३ ऑगस्टला होणार आहे. तर १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. पहिल्या फेरीत जागा रिक्त राहिल्यास दुसऱ्या फेरीची प्रक्रिया २० ऑगस्टनंतर सुरू होईल. म्हणजे तिसरी फेरी सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल.
अभियांत्रिकीसोबतच एमबीए प्रवेशासाठी पहिल्या कॅप फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे १० ऑगस्टपासून सुरू होईल. ही प्रक्रिया १२ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. तर जागांचे वाटप १५ तारखेला होणार आहे. १६ ते १८ ऑगस्ट या कालावधीत तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्ट करावे लागेल.
त्याचप्रमाणे एमसीएचे ऑप्शन फॉर्म ९ पासून भरले जातील. प्रवेश निश्चित करण्यासाठी तुम्हाला १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल. एमटेकसाठी ऑप्शन फॉर्म ८ ऑगस्टपासून भरले जातील. १२ ऑगस्ट रोजी पहिले वाटप होईल. त्याचबरोबर १३ ऑगस्टपासून महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. प्रवेश प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे विद्यापीठाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षांनाही विलंब होणार आहे. यावेळी परीक्षांचे नियोजन करण्यात विद्यापीठ प्रशासनाची दमछाक होत आहे.