शौचालयाच्या खड्ड्यात पडल्याने चिमुकल्याचा अंत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 21:51 IST2019-07-30T21:49:11+5:302019-07-30T21:51:03+5:30
शौचालयाच्या निर्मितीसाठी खोदण्यात आलेल्या सेफ्टी टँकमध्ये पडल्याने पाच वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आर्यन नवदीप राऊत असे या मृत बालकाचे नाव आहे. दवलामेटी ग्रामपंचायततर्फे स्थानिक समाजभवनाजवळ शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. सेफ्टी टॅन्ककरिता खोदलेल्या खड्ड्यात आर्यनचा मृतदेह पाण्यात तरंगत आढळल्याने मंगळवारी सकाळी या परिसरात खळबळ उडाली.

शौचालयाच्या खड्ड्यात पडल्याने चिमुकल्याचा अंत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (वाडी) : शौचालयाच्या निर्मितीसाठी खोदण्यात आलेल्या सेफ्टी टँकमध्ये पडल्याने पाच वर्षीय बालकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आर्यन नवदीप राऊत असे या मृत बालकाचे नाव आहे. दवलामेटी ग्रामपंचायततर्फे स्थानिक समाजभवनाजवळ शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. सेफ्टी टॅन्ककरिता खोदलेल्या खड्ड्यात आर्यनचा मृतदेह पाण्यात तरंगत आढळल्याने मंगळवारी सकाळी या परिसरात खळबळ उडाली.
पोलीस सूत्राच्या माहितीनुसार समाजभवनाच्या काही अंतरावरच नवदीप राऊत यांचे घर आहे. नवदीप राऊत ऑटो चालक आहेत. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास आर्यन या परिसरात खेळत होता. आई सारिका घरच्या दैनंदिन कामात व्यस्त होती. घरी आजी-आजोबा आराम करीत होते. आर्यन घरासमोरील पटांगणात खेळत होता, म्हणून घरची मंडळी निश्चिंत होती. भरपूर वेळ होऊन अंधार पडला असतानाही आर्यन घरी न आल्याने राऊत कुटुंबीयांची तारांबळ उडाली. परिवाराने दोन तास इतरत्र शोध घेतला. परंतू आर्यन न मिळाल्याने वडिलांनी वाडी पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनीदेखील आर्यनचा मध्यरात्रीपर्यंत शोध घेतला, मात्र तो मिळाला नाही. मंगळवारी पहाटे ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी असलेल्या समाजभवनाच्या नजीक बांधण्यात येत असलेल्या शौचालयाच्या सेफ्टी टँकच्या खड्ड्यात एका मुलाचा मृतदेह तरंगताना दिसला. स्थानिकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. मृतदेह बाहेर काढला असता तो आर्यनचाच होता. समाजभवन परिसरात ताराची जाळी लावली असली तरी मुले नेहमी जाळी ओलांडून खेळण्याकरिता जात असतात. हे माहीत असताना खबरदारीची कोणतीही उपाययोजना न केल्याने आणि ऐन पावसाळ्यात शौचालयाचे बांधकाम का सुरू केले, असे प्रश्न निर्माण होत आहेत. स्थानिक प्रशासनाला कंत्राटदाराचे नाव विचारले असता ग्रामपंचायतच हे काम करीत असल्याची माहिती देण्यात आली. परंतु खेमका नावाचा कंत्राटदार हे काम करीत असल्याची चर्चा परिसरात आहे. मात्र ग्रा.पं. प्रशासन कंत्राटदाराचे नाव लपवीत असल्याचा आरोप या परिसरातील नागरिकांनी केला आहे. तसेच स्थानिक नेते हे प्रकरण दाबत असल्याचीही चर्चा सर्वत्र आहे. ग्रामपंचायत प्रशासनाच्या निष्काळजीपणाने चिमुकल्याचा जीव गेला. आर्यनला नऊ वर्षाचा मोठा भाऊ व दोन वर्षाची लहान बहीण आहे.