पर्यटनातून रोजगार; प्रत्येक जिल्ह्यात ५०० युवक, युवतींना प्रशिक्षण - गिरीश महाजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2023 15:55 IST2023-12-15T15:53:47+5:302023-12-15T15:55:23+5:30
नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी संलग्नित 'स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट एन्ड कॅटरींग टेक्नॉलॉजी सोलापूर' या महाविद्यालयासाठी प्रस्तावित पदनिर्मितीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

पर्यटनातून रोजगार; प्रत्येक जिल्ह्यात ५०० युवक, युवतींना प्रशिक्षण - गिरीश महाजन
नागपूर : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील ५०० युवक / युवतींना रोजगार देण्यासाठी पर्यटन व आदरातिथ्य कौशल्य प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी क्षमताबांधणी व प्रशिक्षण योजना (Capacity Building & Training Scheme) राबविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली असल्याची माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
पर्यटनाच्या माध्यमातून राज्यात रोजगार निर्मिती होण्यासाठी प्रत्येक जिल्हयातील ५०० युवक - युवतींना रोजगारक्षम प्रशिक्षण देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री (वित्त) देवेंद्र फडणवीस यांनी सन 2023 च्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. त्याची सुरुवात या मंत्रिमंडळ मान्यतेने झाली. भारतीय पर्यटन, इंडियन इन्स्टीट्यूट ऑफ टूरिझम ॲण्ड ट्रॅव्हल मॅनेजमेंट ग्वॉलेर, इन्स्टीट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट दादर मुंबई तसेच राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि कौशल्य विकास विभागातंर्गत असलेल्या विविध संस्थांच्या माध्यमातून राज्यातील युवक-युवतींसाठी हे प्रशिक्षण दिले जाईल. यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत फेलोशिप प्रोग्रॅम / इन्टर्नशिप प्रोग्रॅम राबविण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
पदनिर्मितीस मान्यता
नॅशनल कौन्सिल फॉर हॉटेल मॅनेजमेंट आणि कॅटरिंग टेक्नॉलॉजी संलग्नित 'स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट एन्ड कॅटरींग टेक्नॉलॉजी सोलापूर' या महाविद्यालयासाठी प्रस्तावित पदनिर्मितीस मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
साहसी जल पर्यटन व आपत्कालीन बचाव प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या Indian Institute of Scuba Diving and Aquatic Sports, (IISDA) या संस्थेला साहसी जल पर्यटन व पाण्याशी सबंधित आपत्कालीन बचाव प्रशिक्षण क्षेत्रातील राज्यस्तरीय संस्था म्हणून घोषित करुन संस्थेच्या माध्यमातून युवकांसाठी विविध रोजगाराभिमुख साहसी जल पर्यटन व आपत्कालीन बचाव प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
खाजगी भागीदारीतून पर्यटन स्थळांचा विकास
सार्वजनिक-खाजगी सहभागाच्या तत्वानुसार खाजगी क्षेत्रातील गुंतवणूकदारांना सहभागी करुन पर्यटन क्षेत्राचा विकास करण्याकरीता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडील जमिन भाडेपट्याने देण्याच्या धोरणास महसूल विभागाच्या सहमतीने धोरण निश्चित करण्यात आले. राज्यातील महाबळेश्वर, माथेरान, हरिहरेश्वर, मिठबाव (रिसॉर्ट + जमिन), ताडोबा, फर्दापूर व अन्य पर्यटन स्थळांचा सार्वजनिक-खाजगी सहभागातून विकास केला जाईल. यासाठी निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या विकासकाकडून पर्यटन क्षेत्राचा विकास करण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली. यामुळे राज्यात येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होऊन पर्यटनाला आणि रोजगार निर्मितीस चालना मिळणार आहे.
सिंधदुर्ग जिल्ह्यात मेगा टुरिझम प्रकल्प
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मे. फोमेंटो रिसॉर्ट एण्ड हॉटेल लि. यांच्याकरीता भुसंपादन करुन भाडेपट्टयाने दिलेल्या सिंधुदूर्ग जिल्ह्यातील ता. वेंगुर्ला मौजे मोचेमाड-आरवली टाक येथील मालमत्तेच्या भाडेपट्ट्याच्या कालावधीत ९० वर्षापर्यंत वाढ करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली.