नागपुरात मुस्लीम बांधवांचा एल्गार; संविधान बचाव रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 10:31 AM2020-01-18T10:31:43+5:302020-01-18T10:32:42+5:30

शुक्रवारी नागपुरात मुस्लीम समाजाने भव्य अशी संविधान बचाव रॅली काढून संविधानाच्या संरक्षणाचा एल्गार केला.

Elgar of Muslim brothers in Nagpur | नागपुरात मुस्लीम बांधवांचा एल्गार; संविधान बचाव रॅली

नागपुरात मुस्लीम बांधवांचा एल्गार; संविधान बचाव रॅली

googlenewsNext
ठळक मुद्देसीएए-एनसीआर रद्द करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागरिकता संरक्षण कायद्या (सीएए) आणि येऊ घातलेला एनआरसी, एनपीआर च्या विरोधात मुस्लीम समाज देशभरात रस्त्यावर उतरला आहे. हा कायदा संविधानविरोधी असून आज संविधानच धोक्यात आले आहे. त्यामुळे सर्वप्रथम संविधान वाचवण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नागपुरातही मुस्लीम समाजाने भव्य अशी संविधान बचाव रॅली काढून संविधानाच्या संरक्षणाचा एल्गार केला. या रॅलीमध्ये मुस्लीम समाजासोबतच बौद्ध, ख्रिश्चन, शिख, ओबीसी आदींसह विविध धर्माचे व समाजाचे बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
नागरिकता संशोधन कायदा (सीएए) आणि त्यासोबतच एनआरसी व एनपीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी फारुखनगर येथून संविधान बचाव रॅली काढण्यात आली. ही रॅली आसीनगर, कमाल चौक, पाचपावली उड्डाणपूल, गोळीबार चौक, टिमकी, मोमीनपुरा, सीए रोड रामझुला, कस्तूरचंद पार्क होत संविधान चौकात पोहोचली. यावेळी प्रामुख्याने मुस्लीम धर्मगुरू मौलाना सय्यद आलमगीर अशरफ, शीख समाजाचे सरदार मलकीत सिंह, मुफ्ती मोहम्मद अकरम, बौद्ध धम्माचे भदंत सदानंद महाथेरो, भदंत ज्ञानबोधी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी मौलाना आलमगीर अशरफ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याच्या सरकारने नागरिकता संशोधन कायद्यात (सीएए) एका धर्माला वगळले आहे. या माध्यमातून सरकार देशातील एकता नष्ट करू पाहत आहे. धर्माच्या आधारावर कायदा करता येत नाही. त्यामुळे हा कायदा भारतीय संविधानाच्या विरुद्ध आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांविरुद्ध आहे. यात उघडपणे भेदभाव केला गेला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिले आहे, त्यात समानता आहे. सरकार भारतीय संविधानाला नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु देशातील जनता हे कधीही होऊ देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. जेव्हापर्यंत हा कायदा रद्द होत नाही तोपर्यंत रस्त्यावर उतरून आंदोलन करत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर एका शिष्टमंडळातर्फे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपती, मुख्यमंत्री आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नावे एक निवेदन सोपवण्यात आले. यात नागरिकता संशोधन कायदा रद्द करणे, एनपीआर परत घेण्याची मागणी करण्यात आली. तसेच पूर्वीप्रमाणे जनगणना करून एनआरसी रोखण्याची मागणी केली गेली.
यावेळी जलील अंसारी, अकील अफसर, माजी मंत्री अनिस अहमद, नगरसेवक इब्राहिम टेलर, हाफिज अख्तर आलम अशरफी, हाफिज अब्दुल बासित, अतीक मालिक, पार्षद मनोज सांगोळे, हाजी आसिफ, इकबाल अंसारी आदी उपस्थित होते.

Web Title: Elgar of Muslim brothers in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.