वृद्ध डॉक्टरला हनीट्रॅपिंगमध्ये अडकवून दोन कोटींच्या खंडणीची मागणी; पोलिसांनी टोळीच्या आवळल्या मुसक्या
By योगेश पांडे | Updated: December 19, 2025 19:20 IST2025-12-19T19:19:23+5:302025-12-19T19:20:21+5:30
तथाकथित पत्रकाराचादेखील समावेश : गुन्हेशाखेच्या घरफोडी विरोधी पथकाची कारवाई

Elderly doctor trapped in honeytrapping, demanded a ransom of Rs 2 crore; Police sneer at gang
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एका वृद्ध डॉक्टरला हनीट्रॅपिंगमध्ये अडकवून त्याच्याकडे दोन कोटींच्या खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. या टोळीत तथाकथित पत्रकार रविकांत कांबळे याचादेखील समावेश आहे. गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने ही कारवाई केली आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.
तथाकथित पत्रकार रविकांत कांबळे, अश्विन विनोद धनविजय (३९, चंद्रमणीनगर, जयभीम को ऑपरेटिव्ह सोसायटी, अजनी), नितीन सुखदेव कांबळे (३८, चंद्रमणी नगर, महाथेरा चंद्रमणी बौद्ध विहाराजवळ, अजनी), कुणाल प्रकाश पुरी (४२, चंद्रनगर, जुन्या कॉर्पोरेशन शाळेजवळ, अजनी), रितेश उर्फ पप्पू मनोहर दुरुगकर (४१, मनिषनगर, बेलतरोडी), आशीष मधुकर कावडे (३६, गोंदिया), आशीष हेमराज साखरे (३५, गोंदिया) व चार महिलांचा आरोपींमध्ये समावेश आहे. या आरोपींनी हनीट्रॅपिंगचे जाळे रचले होते. महिलांच्या माध्यमातून ते सावज हेरायचे व संंबंधित व्यक्तीला एकट्यात बोलवायचे. तेथे महिलांसोबतचे त्याचे खाजगी चित्रीकरण करून ते सार्वजनिक करण्याची धमकी द्यायचे. त्यांनी एका ६२ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला जाळ्यात ओढले.
एका महिलेसोबतचे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत आरोपींनी त्यांना दोन कोटींची खंडणी मागितली. मात्र संबंधित व्यक्तीने गुन्हेशाखेचे सहायक पोलीस आयुक्त अभिजीत पाटील यांची भेट घेतली व आपबिती सांगितली. पोलिसांच्या सांगण्यावरून ज्येष्ठ नागरिकांना ६० लाख रुपये देण्याची तयारी दाखविली. दरम्यान पोलिसांनी विशेष पथक नेमले. आरोपींनी ज्येष्ठ नागरिकाला एका हॉटेलमध्ये बोलविले. तेथे तक्रारदार ३ लाख रुपये घेऊन गेले. मात्र अश्विन, नितीन व कुणाल यांनी तीन लाख रुपये न घेता पूर्ण ६० लाखांची मागणी केली. तेव्हा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर काही वेळातच रविकांतसोबत इतर आरोपींनादेखील ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळून १.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिकाच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्व आरोपींना तहसील पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक दिलीप चंदन, नितीन चुलपार, नितीन तिवारी, गणेश बरडे, प्रवीण रोडे, श्रीकांत उईके, प्रशांत गभने, सुधीर पवार, अमन राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींचे टोळीने वरीलप्रमाणे हनीट्रॅप करत खंडणी मागितली असेल तर पोलिसांना तातडीने संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आरोपींनी अगोदरदेखील उकळले एक लाख
संबंधित डॉक्टर एका ओळखीच्या महिलेला भेटण्यासाठी सप्टेंबर महिन्यात गोंदियाला गेले होते. तेथे आणखी एक तरुणी आली. ती तरुणी व डॉक्टर एकत्रित असताना तिने सलगी केली व त्याच वेळी पठाण, रामटेककर व आणखी एक व्यक्ती आतमध्ये शिरले. त्यांनी व्हिडीओ काढला व तो व्हायरल करण्याची धमकी देत एक लाख रुपये त्याचवेळी उकळले. त्यांनी ते पोलीस असल्याची बतावणी केली होती. त्यानंतरदेखील आरोपींनी आणखी ७८ लाख उकळले. ९ डिसेंबर रोजी कुणाल पुरी डॉक्टरच्या दवाखान्यात गेला व तेथे आरडाओरड करत दोन कोटींची खंडणी मागितली. तसेच रविकांत कांबळे हे प्रकरण मिटवू शकतो असे सांगितले.