नरेश डोंगरे/ नागपूर : अत्यंत वर्दळीच्या अशा नागपूरपुणे रेल्वे मार्गावर प्रवासाचे अंतर 100 किलोमीटरने कमी करण्याचे प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभ प्रसंगी केले. विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठी उपस्थिती, शिस्तबद्ध शालेय विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आलेले नृत्य, गायन तसेच बँड पथकाकडून झालेला गजर अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेसच्या शुभारंभाचा सोहळा अधिकच दिमाखदार करणारा ठरला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून अजनी पुणे वंदे भारतला मार्गस्थ केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आमदार मोहन मते, प्रवीण दटके, चरणसिंग ठाकूर, माजी खासदार डॉक्टर विकास महात्मे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना विभागीय व्यवस्थापक विनायक गर्ग वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक मित्तल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या बहुप्रतिक्षित रेल्वे गाडीचा आज शुभारंभ होणार असल्याचे कळाल्यामुळे मोठ्या संख्येत रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक आठवर उपस्थित होते. नागपूर पुणे मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढतच आहे. त्यामुळे अनेक वेळा खाजगी बसेसचे भाडे पाच हजार रुपये पर्यंत जाते. लोकांना त्यामुळे खूप अडचणीचा सामना करावा लागतो. यामुळे येथून वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी अशी मागणी आपण रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखविला. ही गाडी सुरू झाली. त्यामुळे नागरिकांची चांगली सोय होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
कार्यक्रम स्थळी प्रसार माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशात नागपूर- पुणे वंदे भारतचा रूट हा सगळ्यात लांब पल्याचा रूट आहे.८८१ किमी ची वंदे भारत ट्रेन आतापर्यंत कुठेच सुरू नव्हती. या गाडीमुळे अतिशय वेगाने आणि सुविधेने नागपूर आणि पुणे प्रवास १२ तासात पूर्ण होणार आहे. यापूर्वी १६/१७ तास लागायचे. मात्र आता तो वेळ वाचणार असल्याचे ते म्हणाले. आज रेल्वेच्या ऑथॉरिटी सोबत मी चर्चा केली आहे. आत्ता नगरवरून ट्रेन दौंडला जाते आणि तिथून पुण्याला जाते. सुमारे शंभर ते दीडशे किलोमीटरचा फरक पडतो. म्हणून नगरवरून थेट पुण्यापर्यंत लाईन झाल्यास वेळ आणि अंतर वाचेल. याबाबत रेल्वे मिनिस्ट्रीशी बोलून हे काम आम्ही करू, असेही फडणवीस म्हणाले. छत्रपती संभाजी नगर ते पुणे असा नवा एक्सप्रेस वे होत आहे. त्याच्याच राईट ऑफ वे मध्ये आपल्याला ही रेल्वे करता आली. तर नागपूर पुणे रेल्वेचे डिस्टन्स आणखी १००किलोमीटरपेक्षा जास्त कमी होईल.
अहिल्यानगर ते पुणे आणि अहिल्यानगर ते छत्रपती संभाजी नगर हा संपूर्ण औद्योगिक पट्टा आहे.त्याच्या पलीकडे पुण्याहून आता तीन लाईन आहे त्या पाच लाईन करण्याचं काम सुरू आहे. सोबत जेएनपीटी पोर्ट अशी कनेक्टिव्हिटी करावी, याबाबत मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांच्याशी आपली चर्चा झाली आहे. हे जर आपण केलं तर नवीन मालवाहतूक कॉरिडॉर आपण तयार करू.
संभाजीनगर टू पुणे यांवर बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले, त्यांनी एक अलाइनमेंट तयार केली आहे. त्यांना आम्ही आमची अलाइनमेंट ऑफर देऊ. आमचे लँड एक्वेजशन त्या स्टेजला आहे. आम्ही त्यांना राईट ऑफ वे देऊ शकतो. हे दोन्ही इंटिग्रेट झाले तर नव्याने लँड एक्वेजीशन न करता इंटिग्रेट करता येईल. दुसरे म्हणजे, समृद्धी महामार्गाला लागून जी समांतर ट्रेन असेल ती हाय स्पीड ट्रेन राहावी. जी अडीचशे ते तीनशे किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी असेल. मागे रेल्वे मिनिस्ट्रीने नागपूर मुंबई रेल्वे ट्रेन चा अभ्यास केलेला आहे. त्यावेळी समृद्धी बनत होता. त्या अभ्यासाला समृद्धी सोबत इंटिग्रेट करण्याचा प्रयत्न केला. मात्र समृद्धीच्या नंतर आम्ही इंटिग्रेट केला तर आमच्या लक्षात आले ७८ टक्के राईट ऑफ वे आमच्या सोबत आहे. बावीस टक्के राईट ऑफ हवे, ते स्टेशन सोबत इंटिग्रेट करावे लागेल. त्याबाबत केंद्र सरकार आणि रेल्वे मिनिस्ट्री सोबत आम्ही चर्चा करू, असेही फडणवीस म्हणाले.